निसर्ग... साहस ते कॉर्पोरेट ट्रेनिंग


warmupआकाश भरून आलं होतं. हलका परंतु बोचरा वारा सुटला होता. मा‍झ्या बुटाखालील हिम कुरकुरत होतं. पहाटेचे ५.३० वाजले होते. मी झपझप पावलं टाकत निघालो होतो. जॅकेटची कॉलर कानाशी फडफडत होती. हाडापर्यंत बोचणार्‍या थंडीत हातापायाची बोटं बधिर होत चालली होती. आसपासची सराटे झालेली झाडं करड्या आकाशावर उठून दिसत होती. मला आता धाप लागली होती. मला ट्रेझर हंटच्या मार्गावरील शेवटचा क्लू ठेवायचा होता. ओल्ड मन्सल डेलयेथील घोड्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेल्या एका दगडी डोणीजवळ तो दडवून ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ही डोण एका बसक्या, प्रशस्त दगडी घराच्या आवारात होती. १९८५ साली, मॅन्चेस्टर युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय प्रशिक्षण विभागासाठी आयोजित केलेल्या आऊटडोअर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या ट्रेझर हंटची तयारी चालू होती. मी बघताक्षणीच त्या घराच्या प्रेमात पडलो होतो. अशा एखाद्या शांत इंग्लिश पद्धतीच्या घरात निवृत्त जीवन जगण्याच्या स्वप्नानं मनात घर केलं होतं
१९८२ साली स्कॉटलंडमध्ये मी ‘टीचर्स डिप्लोमा इन आऊटडोअर एज्यूकेशन’ केला. ८५ साली, चार ब्रिटिश भागीदारांसह शेफिल्ड येथे ‘हाय प्लेसेस’ नावाची साहसी पर्यटन कंपनी चालू केली. ह्या कंपनीचे भारतातील उपक्रम व व्यवहार मी प्रामुख्यानं बघणार होतो. एव्हाना भारतातील सर्वात उंच कांचनगंगा पर्वतावरील मोहिमेच्या नेतृत्त्वाबरोबरच हिमालयातील सुमारे डझनभर मोहिमांचे नेतृत्व केले होते. सह्याद्रीमध्ये उदंड भटकंती व प्रस्तरारोहण मोहिमा, युरोपियन आल्प्स्‌मधे भटकंती, कयाकिंग, सेलिंग, स्किइंग, केव्हिंग इत्यादी साहसी मोहिमांतून सहभाग या सर्व निसर्गातील भटकंतीत नुसतंच मन रमलं नाही तर आयुष्य समृद्ध व प्रगल्भ झालं. परिसर्ग प्रशिक्षण तंत्र, ८ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कसे वापरायचे हे तर माहिती होतेच पण ह्याच तंत्राचा वापर मोठ्या वयातील लोकांसाठी म्हणजेच कंपन्यांचे मॅनेजर्स किंवा अधिकारी वर्गासाठी, त्यांच्यातील सांघिक भावना व नेतृत्त्वगुणांच्या विकासासाठीसुद्धा करता येऊ शकतो हे माझ्या ब्रिटिश सहकार्‍यांकडून शिकायला मिळाले व एका वेगळ्याच शोधप्रवासाला सुरूवात झाली.
भारत पेट्रोलियम व बिहेव्हिअरल सायन्स सेंटरकरता आयोजित केलेल्या पहिल्या काही यशस्वी प्रशिक्षण शिबिरांनंतर आम्ही या प्रशिक्षण तंत्राचा प्रसार करण्यास सुरुवात केली. निसर्ग आणि साहस यांची सांगड घालणारं असं काही प्रशिक्षण तंत्र असू शकतं याचा धास्तीयुक्त अविश्वास तेव्हा बहुतेकांच्या मनात होता. गणपती दाते, अरूण जोशींसारख्या तज्ज्ञ मंडळींनी त्यांच्या अनुभवांतून हे तंत्र विकसीत करण्यासाठी योगदान दिलं.
IMG 0443या विषयाचे नाविन्य, सामाजिक स्वीकृतीतील कमतरता वगैरे अनेक कारणांमुळे पहिली ६/७ वर्षे खूप खडतर गेली. खूप परिश्रम पडले पण प्रशिक्षणातील अर्थपूर्णता, सार्थ आशय व कार्यपद्धती आणि महत्त्वाचे म्हणजे निसर्गाची जादुमय शक्ति, यामुळे यथावकाश कॉर्पोरेट्‌समध्ये हे तंत्र रुजू लागलं, रुळू लागलं. कदाचित ती विश्वासार्हता निर्माण होण्यास माझ्या आय.आय.टीच्या पार्श्वभूमीचाही थोडाफार हातभार लागला. नवखं क्षेत्र, अनुभवाचा अभाव यामुळे मनात सुरूवातीला थोडी धाकधूक होती. सुदैवाने त्याकाळात करिअर, पॅकेज, गुंतवणुकीवरील परतावा, नफा-नुकसान ह्या शब्दांनी आजच्यासारखं आक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं नव्हतं. मृणाल, मिलिंद व इतर सर्वच सहकारी खंबीरपणे उभे राहिले व त्यांचा या तंत्रावरील श्रद्धापूर्वक विश्वास कामी आला. लवकरच मी "हाय प्लेसेस'चा कार्यकारी सूत्रधार बनलो. मृणालनं एक सशक्त, संघटित कार्यप्रणाली आणली तर मिलिंदनं त्यात एक साधेपणा व सुसूत्रता आणली. प्रेमसारखे सदैव नवीन काहीतरी शिकण्यास तयार व प्रचंड आशावादी असलेले सहकारी यांनी "हाय प्लेसेस'ला एक सशक्त, प्रगतिशील संघटना बनण्यास मदत केली. आज आमचा २५ वर्षांचा प्रवास थरारक व अपार आनंददायी तर झालाच आहे पण त्यातला थरार आजही टिकून आहे आणि हेच विस्मयकारक व समाधान देणारं आहे.
दुसर्‍या महायुद्धाचा काळ, North Sea भागात असंख्य नेव्हल कॅडेट्‌स मारले गेले. त्यांचा मृत्यू बंदुकांच्या गोळ्या किंवा बॉम्बस्फोटामुळे न होता अतिशीत हवामानामुळे झाला होता. या विचित्र समस्येवर मात करण्यासाठी ‘कर्ट हान’ या शिक्षणतज्ञाने साहस आणि निसर्ग यांचा १९४१ साली सर्वप्रथम नेव्हल कॅडेट्‌सच्या प्रशिक्षणासाठी वापर करून घेतला. इथूनच Outbound Trainingचा जन्म झाला. शारीरिक क्षमता व कणखरता वाढविण्यापलिकडे या पद्धतीचा वापर व्यक्तित्त्व विकासासाठी व व्यवस्थापकीय कौशल्यांच्या संवर्धनासाठीही होऊ शकतो याची जाणीव झाली. ‘अनुभवातून शिक्षण’ हा या पद्धतीचा आत्मा आहे. Team Building, Leadership Development, Integration आणि Induction अशा विविध उद्दिष्टांसाठी या पद्धतीचा गेली ७५ वर्षं पाश्चात्य जगतांत वापर करून घेतला जातो तर गेली २५ वर्षं भारतात ही पद्धत रूढ झाली आहे. Outdoor Management Development ही प्रशिक्षण प्रणाली सर्वप्रथम भारतात आणण्याचं श्रेय ‘हाय प्लेसेस’कडे जातं.
अशा शिबिरांत प्रशिक्षार्थी विविध साहसी आणि रंजक खेळ आणि उपक्रम यात भाग घेतात. प्रत्येक Activity/Exercise नंतर होणार्‍या चर्चासत्रात वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होते. उपक्रमातील यशापेक्षा, या अनुभवातून ‘मला काय मिळालं?’ यावर जास्त भर दिला जातो. स्वतःच्या वागणुकीकडे सखोलपणे पहाण्यासाठी तसेच त्यावर चिंतन करण्यासाठी उत्तेजन आणि मार्गदर्शन केलं जातं. आपल्या कुठल्याही कृतीमागे विचार आणि भावना असतात. यातील विचारांची तर्कशुद्धता बर्‍याचवेळा पडताळली जाते परंतु भावभावनांचा कृतीवर होणारा परिणाम दुर्लक्षीला जातो आणि यातच कुठेतरी विचार आणि भावना यातील समतोल ढासळतो. याचाच परिणाम म्हणजे सांघिक कार्यात आणि नेतृत्त्व करण्यात येणार्‍या अडचणी. निसर्गात घडणार्‍या Activity/Exercise यामुळे या सर्वच गोष्टींकडे पाहताना एक मनमोकळेपणा असतो आणि न बिचकता यातून मिळालेले धडे आचरणात आणण्यासाठी सुलभता येते. या सर्व प्रक्रियेत प्रशिक्षक ‘ग्यान’ देण्याचा आव न आणता मार्गदर्शन करतो. यामुळेच ही शिकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी व परिणामकारक होते. सांघिक कामात व नेतृत्त्वात येणार्‍या अनेक अडचणींवर मात करण्यासाठी विविध मार्ग आणि उपाय आपसूकच सुचतात, सुचवले जातात. एकमेकांकडून शिकण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन दिलं जातं. यामुळेच शिकलेले धडे किंवा उपाय बोजड न होता दैनंदिन कारभारात ते अंगीकारणं सहजसुलभ होतं.
"हाय प्लेसेस'नं गेल्या २५ वर्षांत कॉर्पोरेट क्षेत्रासाठी सुमारे ८००० शिबिरांचं आयोजन केलं आहे आणि यात सुमारे १,६०,००० व्यवस्थापकांनी सहभाग घेतला आहे. गेल्या १०/१५ वर्षांत भारतात अशा धरतीचे प्रशिक्षण देणार्‍या सुमारे ५० लहानमोठ्या संस्था उदयास आल्या आहेत. Classroom पद्धतीला पूरक परंतु अतिशय प्रभावी आणि परिणामकारक पद्धत म्हणून Outbound Training या प्रणालीस मान्यता मिळाली आहे. अशा पद्धतीची शिबिरे आयोजित करण्यासाठी ‘गरूडमाची’नावाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र, ताम्हिणी घाटाच्या माथ्यावर २००४ साली उभारण्यात आले आहे. इथे एकाच वेळेस सात ते आठ शिबिरे आयोजिली जाऊ शकतात आणि दोनशे प्रशिक्षार्थींच्या निवासाची सुसज्ज व्यवस्था या केंद्रात आहे.
आजच्या गतीमान, स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगतात कुठल्याही व्यवस्थापकाला सतत बदलणार्‍या आव्हानांशी झगडावे लागते. यात मानसिक संतुलन आणि स्वास्थ्य आभावित राखणे नेहमीच आव्हानकारक असते. उद्योग विश्वातील विकासाचा चढता आलेख आणि निकोप वैयक्तिक जीवन याची संतुलित सांगड घालण्यासाठी Outbound Training प्रशिक्षण प्रणालीचा अप्रतिम उपयोग होऊ शकतो. मोठ्‌या उद्योगसमुहांपासून SME उद्योगांसाठीदेखील हे उपक्रम राबविता येतात. गेल्या २५ वर्षांतील या क्षेत्रातील वाढ उल्लेखनीय आहे आणि त्याच बरोबर Outbound Training या प्रणालीचा भविष्यकाळ आपल्यासारख्या विकसनशील देशात उज्ज्वल आहे.

To know more visit  www.highplaces.co.in, www.garudmaachi.com
- वसंत वसंत लिमये

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division