भारताला जागतिक निर्मिती केंद्र बनण्याची संधी

Arun Jaitley1PTIवार्षिक ७ टक्क्यांच्या घरात आर्थिक विकास नोंदविणार्‍या चीनमधील आर्थिक संकटामुळे भारताला खर्‍या अर्थाने जागतिक निर्मिती केंद्र म्हणून उदयास येण्याची संधी असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

भारताच्या विकास दरात दोन टक्क्यांपर्यंत भर घालू पाहणारे वस्तू व सेवा कर विधेयक विरोधक काँग्रेसच्या भूमिकेमुळे प्रत्यक्षात येत नसल्याचा आरोपही अरुण जेटली यांनी नुकताच संसदेत केला. मात्र गुंतवणुकीला चालना देण्याचे प्रयत्न कायम असतील, असेही ते म्हणाले. निधी मंजुरीच्या पुरवणी मागणीपत्रावर चर्चा करताना जेटली यांनी आपल्या भाषणात एकूण अर्थव्यवस्थेचा आढावा व आगामी पथप्रवास स्पष्ट केला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून चांगला झाला असून खाद्य उत्पादनही यंदा वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मंदीत असलेल्या देशातील स्टील उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काही प्रस्तावावर विचार करीत असल्याचेही ते म्हणाले.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये येत्या चार वर्षांत ७०,००० कोटी रुपयांचे भांडवल सरकार ओतणार असून यामुळे बँका बाजारातून १.१० लाख कोटी रुपये उभारू शकतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. यामुळे बँका आर्थिकदृष्टय़ा अधिक भक्कम होत अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतील, असेही ते म्हणाले.

चालू आर्थिक वर्षांसाठी ८ टक्के विकास दराचे लक्ष्य असून हा प्रवास निर्धोक होईल, असे चित्र गेल्या काही महिन्यांनी दाखविले असल्याचे जेटली म्हणाले. शेजारच्या चीनमध्ये मंदीसदृश स्थिती असून तेथील वेतन खर्चही वाढला आहे; ही भारतासाठी संधी असून जागतिक दर्जाचे निर्मिती केंद्र म्हणून देशाला पुढे येता येईल, असेही त्यांनी सांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division