"फॉक्‍सकॉन'ची राज्यात 35 हजार कोटींची गुंतवणूक


Foxconnब्लॅकबेरी, आयफोन यांसारख्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि डिजिटल उत्पादनक्षेत्रातील "फॉक्‍सकॉन‘ कंपनीशी पाच अब्ज डॉलर्स (35 हजार कोटी) रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 50 हजार रोजगार निर्मितीचा सामंजस्य करार केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. तळेगाव येथे मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे नजीक दीड हजार एकरावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

तैवान येथील "फॉक्‍सकॉन‘ कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ आणि राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. इलेक्‍ट्रॉनिक उत्पादन, संशोधन आणि विकास अशा तीन पातळ्यांवर पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक करणार असल्याचे "फॉक्‍सकॉन‘ कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) हे या कंपनीचे प्रमुख भागीदार आहेत. सरकारतर्फे जमीन, वीज आणि पाणी देण्यात येणार आहे. या शिवाय स्थानिक कंपन्यांशीही भागीदारी करार करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री चीन दौर्‍यावर असताना त्यांनी "फॉक्‍सकॉन‘च्या एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली होती. त्यावेळी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण त्यांनी "फॉक्‍सकॉन‘ला दिले होते. त्या अनुषंगाने कंपनीचे 60-70 अधिकारी काही दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयाशी सकारात्मक चर्चा करत होते, असे गाऊ यांनी सांगितले. मुंबईसारखे वित्तीय केंद्र आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ असल्याने या प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड केल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेनजीक इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार करण्याच्या दृष्टीने सरकारने ही पावले उचलली आहेत. त्यामुळे एमआयडीसीची तळेगाव येथील जागा "फॉक्‍सकॉन‘ला पसंत पडली आहे. याशिवाय राज्यातील अन्य ठिकाणच्या काही जागाही कंपनीला दाखवण्यात येत आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) कंपनीचे मुख्यालय, खालापूर येथे 600 एकर जमिनीवर संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे इलेक्‍ट्रॉनिक तंत्रज्ञान महाविद्यालय उभारण्याचा "फॉक्‍सकॉन‘चा विचार असल्याचे एमआयडीसीच्या सूत्रांनी सांगितले.

या प्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सरकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

"फॉक्‍सकॉन‘ प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
- 35 हजार कोटींची परकीय गुंतवणूक
- राज्यातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय इलेक्‍ट्रॉनिक प्रकल्प.
- तळेगावमधील जागेला कंपनीची पसंती.
- 50 हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य.
- खालापुरात संशोधन, विकास प्रयोगशाळा.
- आंतरराष्ट्रीय दर्जाचे इलेक्‍ट्रॉनिक तंत्रज्ञान महाविद्यालय.
- परदेशी चलनाची बचत.
- थीन फिल्म ट्रान्झिटर, सेमी कन्डक्‍टरचे होणार उत्पादन.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division