newstag
red   ऊस शेतकर्‍यांची पसंती गूळाला!
   

गेल्या वर्षभरापासून साखरेच्या घटत्या भावामुळे साखर कारखान्यांना ऊस देण्याऐवजी गूळ तयार करण्यावर शेतकरी भर देत असल्यामुळे साखर कारखान्यांपुढे नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.
गतवर्षी पाऊस कमी असल्यामुळे ऊसाचे क्षेत्र 30 टक्क्यांनी घटले आहे त्यामुळे साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. ऊस उपलब्ध करण्यासाठी कारखान्यांना इतरांच्या कार्यक्षेत्रात स्पर्धा करावी लागते आहे. वाहतुकीचे अंतर अधिक असल्यामुळे ऊसाच्या वाहतुकीचा खर्चही साखर कारखान्याला अतिरिक्त सोसावा लागतो आहे. त्या उलट साखरेचा भाव दिवसेंदिवस कमी होतो आहे.
हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना नाराज करणे कोणत्याही परिस्थितीत परवडणारे नाही. कारखान्यांना आíथक मेळ घालणे अतिशय कठीण झाल्यामुळे त्यांच्यासाठी हा परीक्षेचा काळ आहे. उस लागवड क्षेत्र कमी असणारे व मनुष्यबळही कमी आहे असे ऊस उत्पादक साखर कारखान्याला थोडा भाव कमी मिळाला तरी ऊस देणे पसंत करतात मात्र ज्यांच्याकडे मनुष्यबळ आहे असे ऊस उत्पादक गूळ तयार करणे पसंत करत आहेत. साखर कारखान्यांप्रमाणे शेतकर्‍यांकडून ऊसाची नगदी भावात खरेदी करून त्यापासून गूळ तयार करून विकणारे नवे उद्योजक बाजारपेठेत उतरले असल्यामुळे आता कारखान्यांना या उत्पादकांशीही स्पर्धा करावी लागते आहे.
राज्यात लातूर, सांगली, कोल्हापूर या तीनच गुळाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. अन्य बाजारपेठा मोठ्या असल्या तरी त्या थेट शेतकर्‍यांच्या बाजारपेठा नाहीत. त्या बाजारपेठेत व्यापार्‍यांकडून मालाची खरेदी - विक्री होते. ऊसाचे क्षेत्र कमी झाले असले तरी याही वर्षी दरवर्षी प्रमाणेच लातूर बाजारपेठेत दररोज 15 हजार ते 20 हजार गूळाच्या डागाची आवक असल्याची माहिती लातूर जिल्हा गूळ असोसिएशनचे अध्यक्ष ललितभाई शहा यांनी दिली. दररोज आवक वाढते आहे. साखरेच्या प्रमाणात गूळाचा भाव सध्या चढा असून या भावात घसरण होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर बाजारपेठेत येणार्‍या गुळापकी 80 टक्केगूळ हा काळा तर 20 टक्के गूळ पिवळा असतो. घरगुती खाण्यासाठी पिवळा गूळ हा उच्चप्रतीचा म्हणून वापरण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यासाठी जास्त पैसे देण्याची तयारीही ग्राहकांची आहे. ऊस नीट पोसला न जाणे, जमिनीचा पोत, आदी कारणांमुळे काळा गूळ तयार होतो. हा गूळ बहुतांशी दारू तयार करण्यासाठी वापरला जातो. लातूर बाजारपेठेतील सर्वाधिक काळा गूळ गुजरात प्रांतातील अहमदाबाद, मेहसाना आदी ठिकाणी जातो. काळय़ा गुळास "गुजरात चलन' असेच नामाभिधान बाजारपेठेत झाले आहे. गुजरातेत असलेल्या दारूबंदीमुळे हातभट्टीच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाल्यामुळे ही मागणी वाढली असल्याचे बाजारपेठेतील जाणकारांचे म्हणणे आहे. विदर्भातील ग्रामीण भागात आजही साखरेशिवाय गुळाचाच चहा पिण्याची पद्धत असल्यामुळे तिकडेही हा गूळ वापरला जातो. गेल्या आठवडय़ात 2300 रुपये क्विंटलने साखर विकली गेली. प्रत्यक्षात उसाला प्रतिटन 2000 ते 2100 रुपयांपेक्षा साखर कारखाने अधिक भाव देऊच शकणार नाहीत हे लक्षात आलेल्या सुज्ञ शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा गूळ उत्पादन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

red   बँकांचा "एनपीए'ताण हलका करणारे रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रारूप
बँकिंग व्यवस्थेतील कर्ज-बुडिताचे वाढते प्रमाण आणि परिणामी घटणार्‍या नफाक्षमतेच्या समस्येपासून वाणिज्य बँकांना दिलासा देईल, असा सुधार घडविणारे नवीन प्रारूप रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतेच जाहीर केले वाणिज्य बँकांना मिळालेला हा दिलासा या बॅंकांच्या समभागांसाठी गुंतवणूकदारांचे स्वारस्य वाढविणारा ठरला.
डिसेंबर 2013 अखेर संपलेल्या तिमाही निकाल जाहीर करणार्‍या युनियन बँक ऑफ इंडियाने निव्वळ नफ्यात 15.39  टक्क्य़ांची वाढ दर्शवून तो 348.94 कोटींवर नेला. बँकेचे एकूण उत्पन्नही मागील वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत 18.26  टक्क्यांनी वाढून 8,230.17 कोटी रुपयांवर गेले. सद्य:स्थितीत या उमद्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर समभाग 2.94 टक्क्यांनी वधारला. युनियन बँकेच्या नक्त एनपीएचे प्रमाण मात्र डिसेंबर 2013 अखेर 2.26% असून, जे सप्टेंबर 2013 तिमाहीअखेर 2.15% तर डिसेंबर 2012 अखेरच्या 1.70% स्तरावरून लक्षणीय वाईट वळण घेताना दिसत आहे.
त्याउलट सार्वजनिक क्षेत्रांतील सिंडिकेट बँकेने तिमाहीत निव्वळ नफ्यात मागील तुलनेत 25.2 टक्क्यांच्या तूट सोसावी लागली असली तरी, एनपीए प्रमाणात घट आणि त्यापोटी कराव्या लागणार्‍या तरतुदीतील घट मात्र आशादायी आहे. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2012  तिमाहीत कर-परताव्याच्या रूपात मिळालेल्या 141 कोटी रुपयांमुळे यंदाच्या तिमाहीअखेरचा 380 कोटी रुपयांचा निव्वळ नफा त्या तुलनेत 25 टक्क्य़ांनी घसरलेला दिसतो. पण हा विशेष लाभ वजा केल्यास तिमाहीतील नफा प्रत्यक्षात 13 कोटींच्या वाढीचा दिसला असता, असे सिंडिकेट बँकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. सिंडिकेट बँकेचा ढोबळ एनपीएमध्ये तिमाहीगणिक 0.8 टक्क्यांची घट झाली असून, नक्त एनपीए 1.66 टक्क्यांवर स्थिर असल्याचे डिसेंबर २०१३ अखेर दिसून आले. परिणामी शुक्रवारी बँकेच्या समभागाने 3.08 टक्क्यांची उसळी घेतली.
रिझव्‍‌र्ह बँकेचे दिशानिर्देश-
  • वाणिज्य बँकांनी कर्ज-थकीताच्या संकेतांची आगाऊ निश्चिती करावी.
  • अशा अडचणीत येऊ शकणार्‍या कर्ज खात्यांची त्वरेने फेररचना करावी.
  • कर्जफेड थकविली जाण्याआधीच वेळीच वसुलीचे प्रयत्न सुरू करावेत.
red   स्टेट बँकेची 8032 कोटींची भागविक्री
    सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेला जानेवारी अखेरीस झालेल्या संस्थागत भागविक्रीतून 9600 कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात 8032 कोटी रुपये उभारण्यात आल्याचे बँकेने जाहीर केले. यांच्या मते आणखी आठवडाभर उशिराने ही भागविक्री झाली असती तर अधिक चांगला प्रतिसाद मिळू शकला असता.
बँकेने या माध्यमातून 5.13 कोटी समभागांची प्रत्येकी 1565  रुपये सरासरी भावाने विक्री केली. तथापि सरकारच्याच मालकीच्या आयुर्विमा महामंडळाने सुमारे 3000 कोटींची तर अन्य सार्वजनिक बँकांकडून आणखी 2000 कोटींच्या झालेल्या खरेदीने या भागविक्रीला तारलेले दिसून आले. या भागविक्रीबाबत जागतिक अर्थसंस्था आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांमध्ये उत्सुकता निश्चितच होती. परंतु, अर्जेटिना आणि तुर्कस्तानातील चलन संकटाने गढूळ बनलेले वातावरण, त्यातच अमेरिकेच्या फेडकडून द्रवतापूरक रोखे खरेदी आटली जाईल असा घेतला गेलेला निर्णय मारक ठरला, असे मत स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी मांडले. तथापि या भागविक्रीपश्चात स्टेट बँकेच्या भांडवली पर्याप्तता प्रमाणाला 13.2 टक्के पातळीवर नेणारा अपेक्षित परिणाम साधला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
red   स्मार्टफोन बाजारपेठेतून "गुगल' बाहेर
    वेगाने वाढणार्‍या स्मार्टफोन बाजारपेठेत अमेरिकेच्याच अ‍ॅपल व कोरियाच्या सॅमसंगसमोर टिकाव लागणार नाही, हे दोन वर्षांनंतर कळून चुकलेल्या गुगल या आघाडीच्या सर्च इंजिन कंपनीने मोटोरोला ही अधिग्रहित मोबाईल कंपनी अखेर चीनच्या लिनोव्होच्या हवाली केली आहे. या माध्यमातून लिनोव्होला स्वदेशी बनावटीच्या हुवेई, झेडटीईला अधिक जोमाने टक्कर देता येईल. लिनोव्होने हा व्यवहार मार्गी लावल्याने तिच्याकडून ब्लॅकबेरीच्या संभाव्य खरेदीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
लिनोव्हो ही चीनमधील आघाडीची संगणक निर्माती कंपनी म्हणून ओळखली जाते. तेथील हुवेई, झेडटीई या कंपन्या चीनच्या स्मार्टफोन क्षेत्रात पहिल्या दोन क्रमांकाच्या आहेत. तर जागतिक स्तरावर कोरियाची सॅमसंग आणि अमेरिकेच्या अ‍ॅपलनंतर हुवेई 4.9 टक्क्यांसह तिसर्‍या स्थानावर, तर 4.5 टक्के बाजारहिश्श्यासह लिनोव्हो पाचव्या स्थानावर आहे. काही महिन्यांपूर्वीच स्मार्टफोन क्षेत्रात अवतरणार्‍या या चिनी कंपनीला आता मोटोरोलामुळे देशी स्पर्धक हुवेईला मागे टाकण्यासह सॅमसंग आणि अ‍ॅपलजवळ जाता येणार आहे. 2012 च्या अखेरीस गुगलने मोटोरोलाचा मोबाइल व्यवसाय 12.5 अब्ज डॉलर मोजून खरेदी केला होता. आता लिनोव्होबरोबरचा गुगलचा नवा व्यवहार 2.91 अब्ज डॉलरचा झाला आहे. गुगलने नुकताच मोटोरोलाचा केबल बॉक्स व्यवसाय 2.5 अब्ज डॉलरला विकला होता. या दरम्यान मोटोरोलाचा बाजार हिस्सा एक टक्क्याने घसरून 2.3 टक्के झाला आहे.
red   "मिक्सिट' ठरतोय "व्हॉट्सअ‍ॅप'चा भारतातील स्पर्धक
    व्हॉट्सअप, व्हीचॅट, इन-लाइन यासारख्या सध्या उपलब्ध असलेल्या इन्स्टंट मेसेजिंग सोशल साईट्सना स्पर्धक बनून "मिक्सिट'ने उडी घेतली आहे. केवळ स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या अ‍ॅपच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत प्रचंड लोकप्रियता मिळविणारे "मिक्सिट' अ‍ॅपचे वेगळेपण म्हणजे ते वापरण्यासाठी स्मार्टफोन असण्याची गरज नाही. भारतात तब्बल 55 कोटींच्या घरात वापरात असलेल्या विविध 8000 प्रकारच्या सामान्य फोनवरही वापरात येईल. भारताच्या क्रिकेट विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षकपद भूषविणारे दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन हे या अ‍ॅपचे भारतातील सदिच्छादूत आहेत. क्रिकेटवेडय़ा भारतात प्रशिक्षकाविना क्रिकेट खेळणार्‍या लक्षावधींशी जोडले जाण्यासाठी मिक्सिट हे त्यांच्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दक्षिण आफ्रिकेत 46 टक्के मोबाइल इंटरनेटचे ग्राहक असलेले मिक्सिटवर सक्रिय आहेत, असे या अ‍ॅपची लोकप्रियता मिक्सिट इंडिया प्रा. लि.चे मुख्याधिकारी सॅम रुफुस नल्लराज यांनी सांगितले. येत्या काळात भारतातही क्रमांक एक सोशल अ‍ॅप म्हणून नाव कमावण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला."मिक्सिट' जावा, नोकिया, आयओएस, अँड्रॉइड, ब्लॅकबेरी व विडोंज फोन कार्यप्रणालीसह तब्बल 8000 प्रकारच्या हँडसेट्सवर पूर्णपणे विनामूल्य डाऊनलोड करता येईल. सध्या वापरात असलेल्या मेसेजिंग अ‍ॅप्सवर कमाल 140 कॅरेक्टर्सचे संदेश पाठविता येतात, मिक्सिट संदेशांमध्ये 300 पेक्षा जास्त कॅरेक्टर्सच्या वापराची अनुमती देते. मर्यादित मेमरीसह टूजी धाटणीची जोडणीही पुरेशी ठरत असल्याने एसएमएससाठी लागणार्‍या कमी खर्चात हे अ‍ॅप कार्य करते.
red   "फ्लिपकार्ट' व "मिन्त्रा'च्या विलिनीकरणाची शक्यता
    ई-कॉमर्स क्षेत्रातील एकमेकांच्या कट्टर स्पर्धक फ्लिपकार्ट व मिन्त्रा या एकत्र होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दोन स्पर्धक कंपन्यांचे हे एकत्र येणे म्हणजे 300 कोटी रुपयांच्या व्यवहाराची पूर्तता मानले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाढीव तोटय़ाचा सामना करणार्‍या फ्लिपकार्टने मोठय़ा प्रमाणात निधी उभारणीचाही प्रयत्न चालविला आहे. वर्षभरात 1 अब्ज डॉलरची ई-कॉमर्स कंपनी होण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा व्यवहार लाभदायक ठरू शकतो.
उभय कंपन्यांतील एस्सेल पार्टनर्स व टायगर ग्लोबल हे सामायिक गुंतवणूकदारच हे विलीनीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या फ्लिपकार्टचे अस्तित्व सध्या तयार वस्त्र प्रावरणे क्षेत्रात किरकोळ आहे. ते वृद्धिंगत करण्यासाठी या विलीनीकरणाचा लाभ होऊ शकतो. मिन्त्राच्या व्यासपीठावर याच वस्तू खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्वाधिक होतात. फ्लिपकार्टने 54 कोटी डॉलर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून उभारले आहेत. यासाठी एस्सेल, टायगरसह ड्रॅगोनीर इन्व्हेस्टमेन्ट ग्रुप, मॉर्गन स्टॅन्ले इन्व्हेस्टमेन्ट मॅनेजमेन्ट यांनीही माहिती तंत्रज्ञानाच्या व्यासपीठावर वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणार्‍या कंपनीत आर्थिक योगदान दिले आहे. जुलैमध्ये 20 कोटी डॉलर जमा केल्यानंतर कंपनीने ऑक्टोबरमध्येही 16 कोटी डॉलरची रक्कम उभी केली होती. भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात फ्लिपकार्टला ईबे, स्नॅपडिल, अ‍ॅमेझोनसह अनेक मोठय़ा-छोटय़ा संकेतस्थळ कंपन्यांचा सामना करावा लागत आहे.
red   गुजरात प्रकल्पासाठी "सुझुकी' नवी उपकंपनी सुरू करणार
    गुजरातेतील मेहसाणा येथील नव्या प्रकल्पासाठी जपानची सुझुकी मोटर कंपनी स्वतंत्र उपकंपनी स्थापन करणार असून 2017 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी 3050 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
सुझुकी या प्रकल्पात "मारुती'साठी वाहने तयार करणार असून, नव्या प्रकल्पावर पूर्णत: सुझुकीचाच ताबा असेल. पश्चिम भारतातील कंपनीच्या या पहिल्या प्रकल्पाची घोषणा 2012 मध्ये करण्यात आली होती. सुमारे 700 एकर जागेवरील या प्रकल्पातील वाहन निर्मिती क्षमता वार्षिक 2.5 लाख असेल. मारुती सुझुकीमध्ये मुख्य प्रवर्तक सुझुकीचा 56.21 टक्के हिस्सा आहे. प्रवासी वाहन क्षेत्रातील मारुती सुझुकीचा गुजरातेतच आणंद येथे नॅनो या छोटय़ा वाहन निर्मितीचाही प्रकल्प आहे. तर अमेरिकेच्या फोर्डनेही या राज्यात गुंतवणूक करून नवा वाहन उत्पादन प्रकल्प साकारण्याचे धोरण यापूर्वीच जाहीर केले आहे.
खर्चावर नियंत्रण, चलनातील लाभदायक हालचाल याच्या जोरावर मारुती सुझुकी कंपनीने चालू आर्थिक वर्षांच्या तिसर्‍या तिमाहीत वाढीव नफ्याचे वित्तीय निष्कर्ष जाहीर केले. यानुसार कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2013 या दरम्यान 681.15 कोटी रुपयांचा नफा कमाविला. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीला 501.29 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. ऐन सण समारंभाच्या तिमाहीपूर्वी कंपनीला कमी उत्पादन व मागणीचा सामना करावा लागला होता. मारुतीच्या नव्या प्रकल्पावरील सुझुकीच्या ताब्याने गुंतवणूकदारांमध्ये मात्र धास्तीचे वातावरण निर्माण केले आहे. याबाबतचा व्यवहार आता पूर्ण होणार असला तरी भविष्यातील समूहातील वाटचाल अधिक परिणामकारक ठरू शकेल.
red   शेतीसाठी अर्थपुरवठा करणार्‍या सार्वजनिक कंपन्या अडचणीत
   

शेतकर्‍यांनी आपल्या आíथक गरजा पूर्ण करण्यासाठी बिगर बँकिंग वित्तसंस्थांकडे आणि खाजगी बँकांकडे लक्ष वळवल्याने पारंपरिक अर्थपुरवठादार, सार्वजनिक कंपन्या आणि सहकारी वित्तपुरवठादारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. भारतातील लागवडीखालील जमीन 159.7 दशलक्ष हेक्टर असून अमेरिकेनंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. भारतात 1.60 कोटी ट्रॅक्टर हे वाहन शेती तसेच अन्य व्यावसायिक कामासाठी लागतात. पैकी सध्या भारतात 40 लाख ट्रॅक्टर कृषीविषयक कामांसाठी वापरले जातात. ट्रॅक्टरकरिता कर्ज देण्याच्या व्यवसायामध्ये कंपन्यांना वाढीची मोठी संधी उपलब्ध आहे. मात्र हे कर्ज शेतकर्‍यापर्यंत कसे पोहोचेल याविषयी वेळोवेळी चिंता व्यक्त केली गेली आहे. शेतकर्‍याला ट्रॅक्टरकरिता कर्ज मिळण्यासाठी प्रसंगी जमीन गहाण ठेवावी लागते. सार्वजनिक क्षेत्रातील बँका कर्जाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करतात. तिला कागदपत्रे आणि तारण कर्ज आदी बाबींची पूर्तता करून वाटप करण्यासाठी 45 ते 50 दिवस लागतात आणि छोटय़ा शेतकर्‍यांना या व्यवसायाकरिता आकर्षक सवलती मात्र त्या देऊ शकत नाहीत. मात्र खाजगी बँका आणि अनेक आघाडीच्या बिगर बँकिंग वित्तसंस्था (एनबीएफसी) असल्यामुळे कर्जवाटप प्रक्रिया सुलभ बनली असून कर्जवाटपाकरिता अधिक कालावधी उपलब्ध होतो. अनेक वित्तसंस्था एकाच वेळी सहा ट्रॅक्टरकरिता कर्ज देऊ करते; तर त्याच कालावधीत सार्वजनिक बँका मात्र साधी कागदपत्रांची पूर्तता आणि तारणाकरिता एखाद्याच ट्रॅक्टरसाठीचे कर्ज मंजूर करते, असे चित्र आहे. अन्य व्यापारी बँका कृषी क्षेत्रासाठी कमी व्याजदर देऊ करत असल्या तरी कमी वेळेत कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे वितरकांनी एनबीएफसीच्या माध्यमातून कर्ज देण्यास प्राधान्य दिले. अन्य बँकांप्रमाणेच एनबीएफसी या तारणविरहित उत्पादन म्हणून कर्ज देण्यात आघाडीत आहेत. या क्षेत्रात कमी व्याज हा महत्त्वाचा घटक नाही, तर घरपोच सेवा, वेतन अदा करण्यातील लवचिकता आणि जमिनीचे तारण नसणे या महत्त्वपूर्ण घटकांनी एनबीएफसीचा ट्रॅक्टर कर्ज वितरण क्षेत्रात विकास होईल. आगामी वर्षांमध्ये एनबीएफसीचा या क्षेत्रातील हिस्सा वाढण्याची अपेक्षा आहे.
एनबीएफसीचा मुख्य भर हा सर्वसाधारणत: छोटय़ा शेतकर्‍याला ट्रॅक्टरचा मालक बनवणे यावर देण्यात आला आहे. यातून आíथक सर्वसमावेषकता साधण्याचा प्रयत्न केला जातो. देशातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील ग्राहकांना वित्तपुरवठा करण्याचे तत्त्व अनेक बिगर बँकिंग वित्तसंस्था अंगीकारताना दिसतात. ट्रॅक्टर आणि कृषीविषयक कर्ज यातून "कॉर्पोरेट' चित्रही आकारास येते. ट्रॅक्टर कर्जाखेरीज पीक कर्ज, भांडारगृह, सिंचन, जुन्या ट्रॅक्टरवर पुन्हा कर्ज आदी अनेक वित्तसंस्था करतात.
शेतकर्‍यांनी आपल्या आíथक गरजा पूर्ण करण्यासाठी एनबीएफसीकडे आणि खासगी बँकांकडे लक्ष वळवल्याने पारंपरिक अर्थपुरवठादार, सार्वजनिक बँका आणि सहकारी वित्तपुरवठादार यांच्या व्यवसायावर जलद गतीने विपरीत परिणाम होऊ लागला आहे. जेथे लोक मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्नावर अवलंबून असतात तेथे शेतकरी तसेच कृषी उत्पादनासाठी ही सकारात्मक बाब आहे.

red   "ऑडी पुणे'चा विक्रीचा उच्चांक
    कारमध्ये जेवढे नावीन्य अधिक असते, तेवढी कारची लोकप्रियता अधिक असते. भारतातील कारप्रेमींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तरुण वर्ग आणि मोठ्या उद्योजकांमध्ये वेगवेगळ्या कार्सचे आकर्षण आहे. अलीकडील काळात "ऑडी' कारने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ऑडीचे आकर्षक रूप, इतर कारपेक्षा असणारी वेगळी वैशिष्ट्यपूर्ण शैली हेच ऑडीच्या सर्वाधिक लोकप्रियतेचे रहस्य मानले जात आहे. याच कारणामुळे "ऑडी पुणे'ने केवळ एक महिन्यात 100 ऑडी कार विक्रीचा उच्चांक गाठला आहे. डिसेंबर 2013 या महिन्यात "ऑडी पुणे' पुण्यात एक महिन्यात 100 कार्सची विक्री करणारी पहिली प्रीमियम लक्‍झुरियस कार ठरली आहे. 2007 मध्ये सुरू झालेल्या "ऑडी पुणे'ने आपल्या यशाचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे. "ऑडी पुणे'चे संचालक कपिल पाषाणकर म्हणाले, की "ऑडी पुणे'चा पुण्याच्या बाजारपेठेत 30 टक्के ते 35 टक्के वाटा आहे. नवा विक्रम केल्याचे सर्व श्रेय त्यांनी आल्या ग्राहकांना दिले.
red   इंजिनिअरिंग इंडियातील सरकारी हिस्सा विक्रीसाठी उपलब्ध
    निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने घाई सुरू केली आहे. यामुळे सार्वजनिक आस्थापन असलेल्या इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमधील (ईआयएल) 10 टक्के हिस्सा सरकार फॉलोऑन पब्लिक ऑफरच्या (एफपीओ) माध्यमातून विकणार आहे. ही हिस्साविक्री भांडवल बाजारात सहा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
एफपीओच्या माध्यमातून सरकारने इंजिनिअरिंग इंडियामधील 10 टक्के हिस्सा विकल्यास त्यातून 500 कोटी रुपये मिळावेत, अशी अपेक्षा आहे. इंजिनिअरिंग इंडियामध्ये केंद्र सरकारचा 80.4 टक्के हिस्सा आहे. या कंपनीला मिनीरत्न हा दर्जा मिळाला आहे. यापूर्वी सरकारने कंपनीतील 10 टक्के हिश्‍शाची विक्री 2010मध्ये केली होती. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सरकारने आणखी 10 टक्के हिस्सा विकण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार इंजिनिअरिंग इंडियामधील हिस्सा कमी करताना त्याची खरेदी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर करावी यासाठी सरकारने आधीच परदेशांतून तशी प्रसिद्धीही सुरू केली आहे. या एफपीओअंतर्गत सरकार 3.36 कोटी भाग विकणार आहे. यापैकी 5 टक्के भाग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असणार आहेत. आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज, आयडीएफसी व कोटक महिंद्र कॅपिटल, एडलविस फायनान्शियल सर्व्हिसेस तसेच आयडीबीआय या वित्तसंस्था एफपीओचे व्यवस्थापन करणार आहेत.
red   "यूटीआय'ची 101 नवीन केंद्रे सुरू
    युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (यूटीआय) सुवर्णमहोत्सवानिमित्त 101 नवीन वित्तीय केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या निमित्ताने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम व "सेबी'चे अध्यक्ष यू. के. सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्योग व वित्तीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. या वेळी अर्थमंत्र्यांनी देशातील गुंतवणूकदारांना सेवा देण्यासाठी 101 नवीन यूटीआय वित्तीय केंद्रांचे उद्‌घाटन केले. तसेच "यूटीआय'च्या कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन करण्यात आले. यात गेल्या पाच दशकांतील "यूटीआय'चा प्रवास अधोरेखित केला गेला आहे. या संस्थेच्या विकासात मोलाचा हातभार लावणारे माजी अध्यक्ष जी. एस. पटेल, एस. ए. दवे, जगदीश कपूर, जी. पी. गुप्ता, एम. दामोदरन आणि यू. के. सिन्हा यांना या वेळी गौरविण्यात आले.
red   "मर्सिडिज'ची 50 हजारावी गाडी विक्रीसाठी तयार
    नव्या "एस-क्‍लास'ला मिळालेल्या यशानंतर मर्सिडिज-बेंझ इंडियाने आपल्या पुण्याजवळील चाकण येथील उत्पादन प्रकल्पातून 50 हजारावी गाडी बाहेर आणली. हा टप्पा गाठणारी मर्सिडिज-बेंझ ही भारतातील एकमेव लक्‍झरी कार उत्पादक कंपनी आहे. याचनिमित्ताने कंपनीने नवी "सी-क्‍लास ग्रॅंड एडिशन' गाडीदेखील सादर केली.
या वेळी मर्सिडिज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एबरहार्ड कर्न व उपाध्यक्ष (तांत्रिक) पीयूष अरोरा उपस्थित होते. याप्रसंगी कर्न म्हणाले, की आम्ही भारतात टप्प्याटप्प्याने 850 कोटी रुपयांची गुंतवणूक वेळापत्रकाप्रमाणे केली आहे. या उत्पादन केंद्रातून सी-क्‍लास, ई-क्‍लास, एस-क्‍लास, एमएल-क्‍लास आणि जीएल-क्‍लास ही पाच मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेतील संधी लक्षात घेऊन आम्ही पायाभूत सुविधांतील गुंतवणूक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2014 च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरपर्यंत आमची निर्मिती क्षमता दुप्पट होईल आणि आम्ही लवकरच नवनवीन मॉडेलची स्थानिक पातळीवर "असेंब्ली' करण्यास सुरवात करणार आहोत. कर्न यांनी पुढे सांगितले, की सी-क्‍लास ग्रॅंड एडिशनमध्ये अनोखी स्टाईल, डिझाईन आणि कार्यक्षमता यांचा मेळ साधण्यात आला आहे. लक्‍झरी सेदान विभागात आजपर्यंत 19 हजाराहून अधिक युनिट्‌सची विक्री करणारी मर्सिडिज-बेंझ ही "बेस्ट-सेलर' बनली आहे.
red   एमटीएनएल, बीएसएनएलचे एकत्र येणार?
    टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रि‍करणासाठी सरकार पावले उचलत असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणातून तयार होणार्‍या नवीन एकाच कंपनीचा कारभार चांगला आणि व्यवस्थित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. एमटीएनएलच्या मुंबई आणि दिल्लीतील मोफत रोमिंग सेवेचे उद्‌घाटन सिब्बल यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सरकारच्या काही निर्णयांमुळे एमटीएनएलला झळ बसल्याचे त्यांनी या वेळी मान्य केले. 2010 मध्ये स्पेक्‍ट्रम खरेदीचा भार एमटीएनएलवर आला होता; मात्र आता एमटीएनएलने हे 4500 कोटींचे 4 जी स्पेक्‍ट्रम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. सेवा पुरवठादारांना मोजाव्या लागणार्‍या स्पेक्‍ट्रम युसेज चार्जेसचा तिढा लवकरच सोडविण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. एमटीएनएल मुंबईत आणि दिल्लीत सध्या सेवा पुरवते, तर बीएसएनएल देशाच्या उर्वरित भागांत सेवा पुरवते.
red   "मॅक्स मोबाइल'तर्फे 26 नवे हँडसेट बाजारात
    "मॅक्स मोबाइल' या मोबाइल फोन व अॅक्सेसरीजचे उत्पादन करणार्‍या कंपनीने 64 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 नवे हँडसेट बाजारात दाखल केले आहेत. या नव्याने दाखल केलेल्या हँडसेटमध्ये एकोणीस फीचर फोन आणि सात अँड्रॉइड फोनचा समावेश आहे. किफायतशीर दरात दर्जेदार फोन व त्यात जास्तीत जास्त वैविध्य देण्यावर  कंपनीचा भर असेल. फोनची किंमत 1100 ते 5000 रुपयांदरम्यान आहे. या विषयी मॅक्स मोबाइलचे सीएमडी व संस्थापक अजय अग्रवाल यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट 2013 रोजी आम्ही 15 मोबाइल दाखल केले होते आणि आता 26 जानेवारीला 26 मॉडेल दाखल करून ग्राहकांना निवडीसाठी मुबलक पर्याय देत आहोत. यामुळे या आर्थिक वर्षात दाखल केलेल्या नव्या हँडसेटची संख्या 105 असून त्यापैकी 75 फीचर फोन, 28 अँड्रोइड आणि 2 टॅब्लेट आहेत. भारतात वृद्धिंगत झालेली कंपनी म्हणून, आम्हाला भारतीय ग्राहकांची नस माहीत आहे आणि प्रत्येक हँडसेट यूजरच्या गरजा व बजेट यानुसार फोन तयार करतो. विविध किमतींना प्रचंड वैविध्य देऊ करून, प्रत्येक भारतीयाला मोबाइल इकोसिस्टिमशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असून त्याद्वारे आम्ही मोबाइल समावेशकतेमध्ये योगदान देत आहोत. यामध्ये टेक्नालॉजी महत्त्वाची ठरत आहे आणि मोबाइल समावेशकता हा अतिशय महत्त्वाचा पैलू देशाची एकंदर वाढ व विकासासाठी मोक्याचा ठरत आहे. कंपनीने सात अँडॉइड फोन दाखल केले असून त्यामध्ये अँड्रॉइड ओएस जिंजरब्रेड व जेली बीन, 256 एमबी ते 512 एमबी रॅम, 2 मेगापिक्सलपर्यंत प्राथमिक कॅमेरा, एलईडी फ्लॅशलाइट व 1600k एमएचझेडपर्यंत बॅटरी यांचा समावेश आहे. कंपनीने सादर केलेल्या 1.8  ते 2.8 इंची श्रेणीतील 19 फीचर फोनमध्ये ड्युएल सिम, जीपीआरएस, 1500 एमएचझेडपर्यंत चालणारी बॅटरी, अँटि-थेफ्ट व प्रायव्हसी प्रोटेक्शनसारखी सुरेक्षाविषयक वैशिष्ट्ये आणि 8 जीबीपर्यंत एक्स्पांडेबल मेमरी अशी वैशिष्ट्ये आहेत.
red   "फिनो पेटेक'च्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील बॅंकिंग अधिक सक्षम होणार
    ग्रामीण भागात राहणार्‍या लोकसंख्येपर्यंत कमी खर्चात सुरक्षित व पारदर्शक आर्थिक सेवा पोहोचवणे हे सर्वच बँकांसमोर मोठे आव्हान आहे. आजही त्यापैकी 40 टक्के लोकसंख्या बॅँक व्यवहार करण्यापासून वंचित आहे. हे लक्षात घेऊन "फिनो पेटेक' कंपनीने  ग्रामीण भागातील बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी नवीन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. 
देशातल्या प्रत्येक सज्ञान नागरिकाचे बँकेमध्ये खाते असलेच पाहिजे, अशी शिफारस डॉ. नचिकेत मोर समितीने देशातील सर्व बँकांना केली आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये बँकिंग यंत्रणा पोहोचवण्यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रतिनिधी यांचाही योग्य वापर करून जानेवारी 2016 पर्यंत भारतातील सर्वच नागरिकांना बँकेची सुविधा पोहोचवणे हे प्रमुख उद्दिष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठेवले आहे.
"फिनो पेटेक'तर्फे देण्यात येणार्‍या किऑक्स बँकिंग आणि एईपीएस मायक्रो एटीएमसारख्या यंत्रणा या बँकांच्या सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या प्रयत्नांना चालना देणार्‍या आहेत. बँकेच्या   कामाशी संलग्न असलेल्यांशी सहकार्याने काम करून ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे शक्य होणार आहे. यामुळे बॅँकांच्या होण्याबरोबरच त्यांच्या क्षमतेत वाढ होऊन बॅँकांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
आठवडा बाजारातही बॅंकिंग सुविधा
ग्रामीण भागात आठवड्याच्या बाजार वा तालुक्याच्या मुख्य ठिकाणी येऊन बायोमेट्रिक तंत्रज्ञान व लॅपटॉपचा वापर करून ग्राहकांची नोंदणी व बँकांचे व्यवहार करणे शक्य. 
आधार कार्डवर आधारित व्यवहार करण्यासाठी मायक्रो एटीएम प्रणाली 
सहज हाताळता येण्यासारख्या यंत्रामार्फत यूआयडी, मोबाइल आणि ब्रॉडबँड जोडणीसारख्या तंत्रज्ञानाचा एकत्रितपणे वापर.  बँकांच्या मुख्य बँकिंग यंत्रणेशी केंद्रीय बायोमेट्रिक प्रमाणीकरण व यूआयडीवर आधारित व्यवहार संलग्न करण्यासाठी फायनान्शियल इन्क्ल्युजन गेटवे आधुनिक प्रणाली.
red   साखर उत्पादनात 17 टक्क्यांची घट उसाची थकबाकी 10 हजार कोटींवर
    ऊस गाळपाला झालेल्या विलंबामुळे ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या विपणन वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत देशातील साखर उत्पादन 17 टक्क्यांनी घसरून 115.4 लाख टनांवर आले आहे. साखरेची कमी किंमत आणि त्या तुलनेत उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे साखर कारखान्यांनाही आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चालू विपणन वर्षात शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या ऊसाच्या किमतीच्या थकबाकीचा भार वाढून तो तीन हजार कोटी रुपयांवरून दहा हजार कोटी रुपयांवर गेला आहे. 
यंदाच्या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील साखर उद्योगांनी 115.4 लाख टन उत्पादन केले आहे. परंतु अगोदरच्या हंगामातील याच कालावधीत झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत ते 16.6 टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षात 138.5 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली आहे. 
सर्वाधिक ऊस पिकणार्‍या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांसह एकूण देशातच ऊस गाळपाला विलंब झाल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाल्याचे "इस्मा'ने म्हटले आहे. गेल्या 14-15 महिन्यांच्या तुलनेत साखरेच्या किमती घसरून किलोमागे सहा ते आठ रुपयांवर आल्या आहेत. साखरेच्या कमी झालेल्या किमतींमुळे कारखान्यांना कमी उत्पन्न मिळत असून उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी शेतकर्‍यांना ऊसाची किंमत देणे या कारखान्यांना जड जात असल्याचे "इस्मा'ने म्हटले आहे.  यंदाच्या जानेवारीअखेरपर्यंत ऊसाची थकबाकी जवळपास 10 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. परंतु हा हंगाम पुढे सरकेल तशी थकबाकीची रक्कम वाढण्याची भीतीदेखील "इस्मा'ने व्यक्त केली आहे.
red सॉफ्टवेअर निर्यात क्षेत्रात महाराष्‍ट्र अग्रेसर
    संपूर्ण देशातील उद्योगक्षेत्रावर मंदीचे सावट असतानाही महाराष्ट्रातील सॉफ्टवेअर क्षेत्राने भरीव कामगिरी केली असून गेल्या वर्षी 51 हजार कोटी रुपयांची निर्यात केली आहे. यात  पुणे विभागाचा हिस्सा 29 हजार कोटी रुपये आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे महासंचालक ओंकार राय यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 2020 पर्यंत देशाची एकूण निर्यात 700 अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला दिलेली प्राप्तिकर सवलत 2011 मध्ये संपल्यानंतर  सॉफ्टवेअर क्षेत्राने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. गेल्या वर्षी झालेली एकूण निर्यात दोन लाख 51 हजार कोटी रुपयांची आहे.  मंदी असताना त्यात 7.2 टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि पुण्याचा त्यातील वाटा मोठा  आहे.
नाशिकमध्ये लवकरच आयटी पार्क महाराष्ट्रात  नाशिक, नागपूरसारख्या शहरांत येत्या दोन ते तीन वर्षांत नव्या उद्योजकांसाठी दहा लाख चौरस फूट  सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क विकसित केले जाणार आहेत, असे नमूद करून राय म्हणाले की, पुण्यात सध्या 40 हजार चौरस फूट जागा असून त्यातील 13 हजार चौरस फूट नव्या उद्योजकांसाठी उपलब्ध आहे.
red   "नोमुरा' अहवालाची निरि‍क्षणे महागाई घटल्यास विदेशी गुंतवणुकीचा वेग वाढणार
    यंदाच्या वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा सक्रिय होऊन खरेदीचा सपाटा लावल्यामुळे गुंतवणुकीचे चित्र दिलासादायक आहे. महागाई घटल्यानंतर त्यांच्या खरेदीचा हा वेग वाढला आहे. परंतु महागाईतील घसरण अशीच कायम न राहिल्यास हे गुंतवणूकदार बाजाराकडे पाठ फिरवू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
एक ते सतरा जानेवारी या कालावधीत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी कर्ज बाजारात 2.8 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. परंतु आम्हाला अपेक्षित असलेल्या प्रमाणात जर महागाईमध्ये सुधारणा झाली नाही आणि पुन्हा चढ्या व्याजदराकडे वाटचाल सुरू झाली तर भांडवल बाजारात येत असलेला निधी पुन्हा उलट पावली जाऊ शकतो असे मत "नोमुरा'ने आपल्या एका अहवालात व्यक्त केले आहे. 
घाऊक किमतीवर आधारात महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यातील 7.52 टक्क्यांवरून घसरून डिसेंबरमध्ये 6.1 टक्क्यांवर आला. दुसर्‍या बाजूला किरकोळ महागाईदेखील 11.6 टक्क्यांवरून कमी होऊन 9.9 टक्क्यांवर आली आहे. 
मे महिन्याच्या शेवटी अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने आपला 85 अब्ज डॉलरचा मासिक रोखे खरेदी कार्यक्रम कमी करण्याची घोषणा केली. त्याचा परिणाम म्हणून विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी जवळपास सहा महिने बाजारातून हळूहळू गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली.
परंतु डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हने हा रोखे खरेदी कार्यक्रम 10 अब्ज डॉलरने कमी करणार असून त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर डिसेंबरमध्ये हे गुंतवणूकदार पुन्हा बाजारात सक्रिय झाले. 
"नोमुरा'च्या अहवालाची वैशिष्ट्ये:-
चलन बाजारात स्थिरावलेला रुपया आणि  महागाई कमी झाल्यामुळे व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता यामुळेदेखील बाजारात निधी येत असल्याची शक्यता आहे. 
कर्ज बाजारात विदेशी निधीचा ओघ वाढला तर नजीकच्या काळात चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी ती फायदेशीर ठरेल.  एक ते 17 जानेवारी या कालावधीत विदेशी गुंतवणूकदार संस्थांची कर्ज बाजारात 2.8 अब्ज डॉलरची गुंतवणूक.
red   विकासदर अपेक्षित पातळी गाठणार – "मुडीज'चा अंदाज
    भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदीचे प्रमाण घटत असले तरी विकासदर पुढील वर्षातच अपेक्षित पातळी गाठणार असून यंदाच्या आर्थिक वर्षात तो पाच ते साडेपाच टक्क्यांपर्यंत आणि 2015 मध्ये तो सहा टक्क्यांच्याही वर जाईल, असा अंदाज "मुडीज'च्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांनंतर अर्थव्यवस्थेला खर्‍या अर्थाने गती मिळेल. स्थिरावलेला रुपया आणि नियंत्रणात आलेली चालू खात्यातील तूट या दोन मुख्य जोखमींनंतर विकासदर स्थिरावला असल्याचे "मुडीज'ने म्हटले आहे. 
जीडीपीची वाढ अपेक्षित पातळीपर्यंत झालेली नसली तरी अलीकडच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था स्थिरावली असून जोखमीचे प्रमाण कमी झाले आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या रोखे खरेदी कार्यक्रमामुळे मागील वर्षात रुपया जितका संवेदनशील झाला होता, आता तो तितका नाही. या वर्षात अर्थव्यवस्थेत हळुवार सुधारणा होणार असली तरी 2015 पर्यंत ती अपेक्षित पातळीवर येणार नाही, असे "मुडीज'ने आपल्या अहवालात म्हटले आहे. निर्यातीमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून त्याची  सुरुवात मागील वर्षाच्या मध्यापासून सुरू झाली आहे जवळपास 30 महिन्यांनंतर विकासदराचा चढता आलेख सुरू झाला आहे.
सध्या आर्थिक घसरण दिसत असली तरी पुढील वर्षात सुधारणा : "क्रिसिल'        चालू खात्यातील वाढलेली तूट तसेच अन्य कारणांचा विचार करता "क्रिसिल'  या पतमानांकन संस्थेने मात्र चालू आर्थिक वर्षात विकासदर 4.8 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे; परंतु सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता कृषी क्षेत्रामुळे विकासदराला गती मिळण्याची अपेक्षा "क्रिसिल' ने व्यक्त केला आहे. या अगोदर "क्रिसिल' ने 2013 - 14 वर्षात विकासदरात 5.5 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. महसूल वाढ फारशी न झाल्याने सरकारने 4.8 टक्के वित्तीय तुटीचा व्यक्त केलेला अंदाज अति असून ती यंदाच्या आर्थिक वर्षात 5.2 टक्के राहील, असे म्हटले आहे. चांगला पाऊस झाल्याने कृषी क्षेत्राकडून जीडीपी 5.2 टक्क्यांर्पंत वाढण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच एकट्या कृषी क्षेत्राची यंदाच्या वर्षात 4.5 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज "क्रिसिल'च्या व्यवस्थापकीय संचालक रूपा कुडवा यांनी व्यक्त केला. कृषी क्षेत्राची वाढ मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे.
red   "एलपीजी'ला आता पोर्टेबिलिटी लागू
    देशातील 480 जिल्ह्यांत ग्राहकांना आता गॅस कंपनी बदलता येणार असल्याचे म्हणजेच मोबाइलप्रमाणेच स्वयंपाकाच्या गॅसला (एलपीजी) आता पोर्टेबिलिटी लागू झाल्याचे केंद्रीय तेलमंत्री वीरप्पा मोईली यांनी अलिकडेच एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. ते म्हणाले, मोबाइल कंपन्यांप्रमाणे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची पोर्टेबिलिटी सुविधा सुरू करण्यात आली असून ज्या शहरात एकापेक्षा जास्त गॅस वितरक आहेत तेथील ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशातील 13 राज्यांतील निवडक 24 जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर गॅस पोर्टेबिलिटी लागू केली होती. आता ही सुविधा 480 जिल्ह्यांत मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर स्थानिक स्तरावरील वितरकाची निवड ऑनलाइन करायची असून ग्राहकांच्या सोयीसाठी वितरकांना रेटिंग देण्यात आले आहे. ज्या वितरकांची कामगिरी चांगली आहे अशा वितरकांना चांगले रेटिंग असून त्यानुसार ग्राहकांना पर्याय निवडण्यास मदत होणार आहे. ऑनलाइन नोंदणीनंतर ग्राहकांनी संबंधित वितरकाशी संपर्क साधून पोर्टेबिलिटीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे.
red   मार्च रोजी "आम्ही उद्योगिनी'तर्फे राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद
    "आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान' ही संस्था गेली 17 वर्षे महिलांमध्ये उद्योजकतेचे बीज रुजवण्याच्या दृष्टीने लक्षणीय योगदान करत आहे. त्यांच्यातर्फे शनिवार दि. 1 मार्च 2014 रोजी मुंबई येथे एक दिवसीय राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद आयोजित करण्यात येत आहे.
या प्रसंगी मा.राजश्री बिर्ला-आदीत्य बिर्ला ग्रुप, मा. पद्मविभूषण शोभनाताई रानडे-कस्तुरबा गांधी टस्ट,पुणे  व इतर मान्यवर उपस्थित असतील.
सकाळच्या सत्रामध्ये अनिल गुप्ता (नॅशनल इन्होवेशन फाऊंडेशन), रमेश देवकर (महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळ), सुषमा कानिटकर (रिप्रेझेंन्टेटीव्ह पेन्सीलव्हानिया स्टेट)  व राधिका रस्तोगी- (ट्रेजरी ऍण्ड अकाऊंटस विभाग) यांचे मार्गदर्शन लाभेल.  
दुसर्‍या सत्रामध्ये "उद्योगाचे तंत्र आणि मंत्र' या विषयावर पुण्याच्या मानसी बिडकर-मेलकॉन इंडीया, प्रिती शर्मा-मेनन-वीरा कॅब्स, मराठवाडयाच्या वनिता दंडे, गोव्याच्या सुनिता गावणेकर या उद्योगिनींच्या मुलाखती घेण्यात येतील.
सायंकाळच्या सत्रात "आम्ही उद्योगिनी पुरस्कार' वितरण समारंभामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील महिला उद्योजिकांचा गौरव करण्यात येईल. या प्रसंगी एस एन डी टी च्या कुलगुरु- डॉ.वसुधा कामत, रोहीणी हट्टंगडी - प्रख्यात अभिनेत्री, अनुया म्हैस्कर - म्हैस्कर फाऊंडेशन ह्यांच्या उपस्थिती लाभणार आहे.
उद्योग क्षेत्रात येणार्‍या महिला, उद्योगात आपलं अस्तित्व शोधणार्‍या आणि उद्योगाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास धडपड करणाऱ्या प्रत्येकाने ह्या परिषदेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन "आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान'च्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले आहे. आय ई एस मॅनेजमेंट कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेली ही परिषद मुंबई, दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या बी.एन.वैद्य सभागृहामध्ये भरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क-: 022-, 24312426 / 8082034949 /9820135650.
red   संगणकनिर्मितीतून सोनी बाहेर
    गेल्या काही वर्षातील व्यावसायिक तोटा भरून काढण्यासाठी सोनी कंपनीने संगणक निर्मिती क्षेत्रातून बाहेर पडण्याची योजना आखली आहे. कंपनीने "व्हायो' हा संगणकाचा ब्रॅंड जपानमधील एका गुंतवणूक कंपनीला विकण्याची घोषणा केली आहे.
याचबरोबर पाच हजार कामगारांची कपात करून कंपनी दर वर्षी 1.08 अब्ज अमेरिकी डॉलर वाचविण्याचा विचार करीत आहे. ही कामगारकपात पुढील वर्षीच्या सुरवातीपासून सुरू होईल.  जपानमधील शार्प आणि पॅनासॉनिक सारख्या इलेक्‍ट्रॉनिक कंपन्यांसमोर जगातील स्पर्धक कंपन्याचे मोठे आव्हान उभे आहे."बाजारपेठेत होणारे बदल लक्षात घेऊन कंपनीने संगणक निर्मिती बंद करून स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.,' असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काझुओ हिराई यांनी सांगितले.
red   विमाक्षेत्रात 26 टक्के परदेशी गुंतवणुकीला मान्यता
    केंद्र सरकारने विमाक्षेत्रात 26 टक्के परदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.  ब्रोकिंग, थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर्स व सर्व्हेअर अशा विम्याशी संबंधित व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी ही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सहविमा उद्योगासाठी परदेशी गुंतवणूकदार संस्था व अनिवासी भारतीय यांचा गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. यासंदर्भात सरकारने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे विमा कंपन्यांत 26 टक्‍क्‍यांपर्यंत परदेशी गुंतवणुकीला ऑटोमॅटिक रूटच्या माध्यमातून मान्यता देण्याचे निश्‍चित करण्यात आले असून, त्यात थेट परदेशी गुंतवणुकीचाही समावेश आहे. यापूर्वी विमा क्षेत्रात ऑटोमॅटिक रूटच्या माध्यमातून केवळ थेट परदेशी गुंतवणुकीलाच सरकारने परवानगी दिली होती. अशा प्रकारे गुंतवणूक करू इच्छिणार्‍या परदेशी संस्थेला किंवा गुंतवणूकदाराला प्रथम विमा नियामक व विकास प्राधिकरणाकडून (आयआरडीए) आवश्‍यक परवाना घ्यावा लागणार आहे. सरकारने हा निर्णय तत्काळ लागू केला आहे. विमा उद्योगात 49 टक्के परदेशी गुंतवणुकीला सरकार मान्यता देईल अशी अपेक्षा असणाऱ्यांची मात्र या निर्णयामुळे विमा क्षेत्राची काहीशी निराशा झाली आहे.
red   अॅम्युझमेंट पार्कक्षेत्रात वाढती गुंतवणूक
   

निरनिराळ्या आकर्षक क्रीडाप्रकारांच्या माध्यमातून मनोरंजन घडवणार्‍या यामुळे अॅम्युझमेंट म्हणजेच मनोरंजन पार्कना जनतेची वाढती पसंती मिळत आहे. आगामी काळात या मनोरंजन पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल, असे मत इंडियन असोसिएशन ऑफ अॅम्युझमेंट पार्क्‍स अँड इंडस्ट्रीजचे (ईआपी) अध्यक्ष योगेश डांगे यांनी नुकतेच मुंबईत व्यक्त केले. ईआपीतर्फे मुंबईत भरलेल्या एक्‍स्पो प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "2013 मध्ये मनोरंजन पार्कमध्ये आठ टक्के वाढ झाली. या काळात देशाच्या अनेक भागात नवी मनोरंजन पार्क सुरू झाली. एप्रिल 2013मध्ये खोपोलीजवळ अॅडलॅबचे "इमॅजिका' हे मनोरंजन पार्क सुरू झाले. या पार्कने एक हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. मनोरंजन पार्कच्या माध्यमातून 2008 मध्ये सुमारे एक हजार 500 कोटी रुपये महसूल मिळाला होता. या महसुलात 2020 पर्यंत वाढ होऊन तो चार हजार कोटी रुपये होईल.'
या एक्‍स्पो प्रदर्शनात मनोरंजन पार्क क्षेत्रातील जगभरातील एकूण 80 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, जर्मनी, हॉंगकॉंग, इटली, फिलिपिन्स, रशिया, स्पेन, नेदरलॅंड्‌स, तुर्कस्तान, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन व अमेरिका या देशांतील कंपन्यांचा समावेश आहे.

red   "दिल्ली ऑटो एक्स्पो'
   

'ऑटो एक्स्पो'मध्ये हॅचबॅक ते लक्झरी कारच्या एकाहून एक सरस मॉडेल सादर झाली. एकीकडे देशातील वाहन उद्योगाला मंदीने ग्रासल्याचे चित्र बदलत असल्याचे संकेत या सादरीकरणामुळे मिळाले.
भारतीय ग्राहकाची वाढणारी क्रयशक्ती, त्यांच्यात ब्रँडबद्दल निर्माण होणारी जागरूकता आणि सातत्याने हवेहवेसे असणारे बदल या पार्श्वभूमीवर जगातील लक्झरी कार उत्पादकांनी भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केल्याचे चित्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीमध्ये भरलेल्या ऑटो एक्स्पोच्या रूपाने पाहायला मिळाले. गेल्या वर्षभरापासून देशातील वाहन उद्योगाला मंदीने ग्रासले असले, तरी या प्रदर्शनात सादर झालेल्या लक्झरी कारच्या संख्येवरून भविष्यात चांगली परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळाले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मर्सिडिझ बेंझ, जॅग्वार-लँडरोव्हर, ऑडी, बीएमडब्लू या लक्झरी कार उत्पादक ब्रँडचा बोलबाला पाहण्यास मिळाला.
प्रदर्शनाची एकंदरीत रचना आणि उभारणी पाहता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहन प्रदर्शन भारतात आयोजित केल्याचे जाणवते आहे. मर्सिडिझ बेंझने चालू वर्षात स्पोर्ट्स कार, कॉम्पॅक्ट एसयूव्ही, सेदान कार लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा केली. बीएमडब्लू इंडियाची इलेक्ट्रिक कार प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरली. कंपनीने प्रदर्शनाच्या निमित्ताने चार कार लाँच केल्या. ऑडी इंडियाने ए3 ही एंट्री लेव्हल सेदान कार लाँच केली. तर, टाटा मोटर्सच्या अखत्यारित असलेल्या जग्वार ब्रँडच्या दोन कार लाँच करण्यात आल्या. मोटारींच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि मॉडिफाइड डिझाइन्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या दिलीप छाब्रिया यांनी स्पोर्ट्स कार, एसयूव्ही आणि हॅचबॅक कारच्या माध्यमातून कार उत्पादनाची सुरुवात करीत असल्याचे जाहीर केले. अवंती ही देशी बनावटीची पहिली स्पोर्ट्स कार सप्टेंबरमध्ये बाजारात आणणार असल्याचेही छाब्रिया यांनी जाहीर केले.
महिंद्रा ग्रुपच्या फर्म आणि इलेक्ट्रिक व्हेइकलने महिंद्रा रेवोने ऑटो एक्स्पोमध्ये फॉर्मूला ई कार लॉन्च केली. या प्रकारची भारतात लॉन्च झालेली ही पहिलीच कार आहे. महिंद्रानेही ही कार FIA फॉर्मूला चॅम्पियनशिपमध्ये सहभागी  करण्यासाठी ही कार डिझाइन केली आहे. ही कार अवघ्या 3 सेकंदात 100चा स्पिड गाठते.
ई-रेसिंग कारसोबतच महिंद्राने XUV500 आणि क्वांटो कारही लॉन्च केल्या आहेत. XUV500ही हायब्रिड टेक्नोलॉजीने तयार केलेली पहिली SUV कार आहे.
हॅचबॅक ते लक्झरी कारबरोबरच चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती ऑटो एक्स्पोचे आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली.

red   "फिच' रेटिंग एजन्सीला ‘एनपीए’ची चिंता
    जागतिक स्तरावरील रेट‌िंग एजन्सी 'फिच'ने भारताच्या अर्थव्यवस्थेतील स्थितीबाबत समाधान व्यक्त केले असले तरी बँकांच्या थकीत कर्जांबाबत मात्र चिंता मांडली असल्याचे 'इकॉनॉमिक एफेअर'चे सचिव अरविंद मयाराम यांनी सांगितले. फिचच्या प्रतिनिधींनी केंद्रीय अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांशी याबाबत सविस्तर चर्चा केली. सध्या बँकांच्या थकित कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकने रचनात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. कर्ज वसुलीची समस्या सुरुवातीच्या स्तरावरच ओळखणे, कर्जाची फेररचना करणे असे अनेक पर्याय देणारे धोरण रिझर्व्ह बँकेने जाहीर केले असून त्याचा बँकांना फायदा होऊ शकेल. याबाबतची माहिती "फिच'च्या प्रतिनिधींना देण्यात आली. सध्या बँकांच्या थकित कर्जाचे प्रमाण 4.5 टक्के असून ते 4.8 टक्क्यांवर जाण्याची भीती रिझर्व्ह बँकेनेच व्यक्त केली होती.
red   ‘एफडीआय’साठी "अॅमेझॉन'चे प्रयत्न
   

देशात ई-कॉमर्स क्षेत्रात संभाव्य बदलाचे वारे वाहत असताना, अमेरिकेत ई-रिटेलमधील बलाढ्य कंपनी "अॅमेझॉन' भारतात ई-कॉमर्समधील 'एफडीआय'साठी प्रयत्न करत आहे. गेली 14 वर्षे अॅमेझॉन ग्रूप विविध मुद्द्यांवर लॉबिंग करत असले तरी भारतातील संभाव्य बिझनेससाठी ग्रूपने पहिल्यांदाच अशा तऱ्हेचे प्रयत्न केले आहेत.
सध्या भारतात ई-कॉमर्स क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देण्यात आलेली नसली तरी, हे क्षेत्र एफडीआयला खुले करावे का, याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार विविध अंगी चर्चेसाठी तयार आहे.
सध्या अॅमेझॉन भारतात व्यवसाय करीत असले तरी कंपनीला उत्पादनांची थेट विक्री करता येत नाही. फक्त विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनासाठी वेबसाइटचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देता येतो!
अमेरिकेत व्यापारी उद्देशाने लॉबिंग करणे कायदेशीर मानले जाते. मात्र, कोणत्या उद्देशाने कुठे आणि कसे लॉबिंग केले याचा तपशील कंपनीने उपलब्ध करून द्यावा लागतो. गेल्या महिन्यात 22 जानेवारी रोजी 'डिसक्लोजर रिपोर्ट-2013' जाहीर झाला असून त्यात अॅमेझॉनच्या लॉबिंगची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अॅमेझॉनने केलेल्या लॉबिंगमध्ये गैर काहीही नाही. भारतात मात्र असे लॉबिंग बेकायदा ठरवले जाते!
अमेरिकेतील व्यापारी प्रतिनिधी, वाणिज्य विभाग, परराष्ट्र खाते आणि अमेरिकेतील प्रत‌िनिधीगृहातील सदस्यांकडे अॅमेझॉनने लॉबिंग केले असून गेल्या संपूर्ण वर्षांत कंपनीने 34 लाख 50  हजार डॉलर खर्च केल्याचे अहवालातून दिसते. कंपनी गेल्या 13 वर्षांत 2 कोटी 15 लाख डॉलर म्हणजेच 136 कोटी रुपये लॉबिंगवर खर्च केले आहेत.

red   "सहारा ग्रुप' कडून मोठी गुंतवणूक आणि कर्मचारी भरतीची घोषणा
    गुंतवणूकदारांना वीस हजार कोटी रुपयांचा रिफंड देण्यावरून सहारा ग्रुप आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्यातील वाद सुप्रीम कोर्टात आहे. मात्र, सहारा ग्रुपने 32 हजार 400 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 56 हजारांहून अधिक कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली आहे.
कंपनीतर्फे देश-परदेशातील एकूण जागांसाठी मिळून 2014 अखेर 56 हजार कर्मचारी भरती केली जाणार असल्याचे नमूद आहे. पुढील तीन वर्षांत चार लाख रोजगार निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यात नमूद आहे. एफएमसीजी, रिटेल, डेअरी, पोल्ट्री, लक्झरी रिअल इस्टेट, लाइफ स्टाइल, फूड फॅक्टरी, लो-कॉस्ट हाउसिंग, सीएसआर, शिक्षण आदी क्षेत्रांसाठी ही कर्मचारी भरती केली जाणार आहे. लक्झरी रिटेलमध्ये पुढील पाच वर्षांत 1400 कोटी रुपयांची, तर अन्न, पेय आणि मनोरंजनसाठी 5172  कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. युरोपातील मॅसेडोनिया येथील डेअरी व्यवसायामध्ये 13,922 कोटी रुपये आणि हॉस्पिटॅलिटीसाठी 9600  कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. हेल्थकेअरमध्ये 2300 कोटी रुपयांची गुंतवणूक पुढील पाच ते सात वर्षांत होण्याची अपेक्षा आहे असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
red   "आयटी निर्यातीत 15 टक्के वाढ होणार'-"नॅसकॉम'
युरोप आणि अमेरिकेत आर्थिक स्थिती सुधारत असल्याने देशातील सॉफ्टवेअर आणि बीपीओ कंपन्यांच्या निर्यातीत 13 ते 15 टक्के वाढ होईल आणि 15 ते 17 अब्ज डॉलरचे अधिक उत्पन्न पुढील आर्थिक वर्षात मिळण्याचा अंदाज 'नॅसकॉम'ने वर्तविला. या वर्षी निर्यातीतून मिळणारे उत्पन्न 86 अब्ज डॉलरवर जाण्याची अपेक्षा आहे. पुढील आर्थिक वर्षात 97 ते 99 अब्ज डॉलरवर राहील. या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 118 अब्ज डॉलरवर राहील, अशी शक्यता आहे. 'जागतिक पातळीवर आयटी आणि बीपीओ सेवा घेण्यामध्ये दुपटीने वाढ होत आहे. त्यामुळे देशातील आयटी क्षेत्राची वाढ अधिक वेगाने होत आहे. मात्र, स्थानिक बाजारपेठेची कामगिरी निराशाजनक आहे. गेल्या आर्थिक वर्षात आणि या आर्थिक वर्षात उत्पन्न 32 अब्ज डॉलरवर राहण्याची अपेक्षा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा परिणामही होत आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात व्यावसायिक पातळीवर सकारात्मक बदल होण्याची शक्यता कमी आहे.'' असे मत नॅसकॉम'चे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.
red   ‘फास्ट फूड’ची विक्रीत घट
    गेल्या काही वर्षांत भारतात भरभराटीला आलेल्या फास्ट फूडच्या उद्योगावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज यांसारख्या फास्ट फूडच्या विक्रीत घट होत असून, या उद्योगालाही आर्थिक मंदीची झळ बसत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
मोठमोठ्या 'क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट' (क्यूएसआर) चेनमधील पदार्थांच्या किमती कमी ठेवूनही गेल्या काही काळात त्यांची विक्री घटली असल्याचे दिसून आले आहे. मॅक्डोनाल्ड्स; केएफसी आणि पिझ्झा हट; डॉमिनोज आणि डंकिन डोनट्स या चेन्सना या ट्रेंडचा फटका बसला आहे. 2013 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत 1600हून अधिक 'क्यूएसआर' आउटलेट्समधील विक्री त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत घटली असल्याचे दिसून आले आहे. वाढती महागाई हेच त्यामागचे महत्त्वाचे कारण असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
फास्ट फूडची मंदावलेली विक्री
कंपनी क्यूएसआर चेन  विक्रीची स्थिती (2013)
यम केएफसी, पिझ्झा हट - 4% (ऑक्टो.-डिसें.)
हार्डकॅसल रेस्टॉरंट्स मॅकडोनाल्ड्स (पश्चिम, दक्षिण)     - 5.5% (जुलै-सप्टें.)
कनॉट प्लाझा मॅकडोनाल्ड्स (उत्तर, पूर्व)    - 8% (ऑक्टो.-डिसें.) ज्युबिलियंट फूडवर्क्स डॉमिनोज, डंकिन डोनट्स   - 2.6% (ऑक्टो.-डिसें.)
red   बँकिंग क्षेत्रात 20 लाख नवीन संधी
    ग्रामीण भागापर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्यासाठी रिझर्व्ह बॅँक आणि सरकारचे सुरू असलेले प्रयत्न आणि त्याच्याच जोडीला देण्यात येणारे नवीन बँकिंग परवाने यामुळे बॅँकिंग क्षेत्रात नोकर्‍यांच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत. पुढील पाच ते दहा वर्षात या क्षेत्रात 20 लाख नवीन रोजगार नोकर्‍या निर्माण होईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे पुढील काही वर्षांमध्ये राष्ट्रीयीकृत बॅँकांमधील जवळपास अर्ध्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे. परिणामी राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये नोकरभरतीला जास्त चालना मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
‘रॅँडस्टॅँड इंडिया’ या मनुष्यबळ स्रोत सेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार येणार्‍या दशकात बॅँकिंग क्षेत्रात सात ते दहा लाख नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. चालू वर्षात सर्वाधिक रोजगार देण्याच्या बाबतीत बॅँकिंग उद्योग अव्वलस्थानी असेल असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. या क्षेत्रात होत असलेल्या विस्तारामुळे पुढील पाच वर्षातच 18 ते 20 लाख नवीन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याचा अंदाज मणिपाल अकॅडमी ऑफ बॅँकिंगने व्यक्त केला आहे.
red   चिनी सायकल लंका, बांगलादेशमार्गे भारतात
    चिनी सायकलींना आजकाल भारतात वाढती मागणी आहे. त्यामुळेच कमी सीमा शुल्क आकारले जावे म्हणून चीनने श्रीलंका, बांगलादेशमधून सायकल भारतात पाठवण्यास सुरूवात केली आहे. भारतातील काही आयातदार चीनच्या कमी किमतीच्या सायकलींची मागणी करत आहेत. श्रीलंका, बांगलादेश यांच्याबरोबर भारताचा मुक्त व्यापार करार आहे. त्याचा फायदा घेऊन व्यापार्‍यांनी ही शक्कल लढवली आहे. चिनी उत्पादनाचा प्रचंड ओघ रोखण्यासाठी केंद्र सरकारने आयात कर 10 वरून 20 टक्क्यांवर नेला आहे. तर सायकलवरील कर 10 वरून 30 टक्क्यांवर गेल्याने आयातदारांनी ही शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला आहे.
red   "निमा'तर्फे औद्योगिक व वीजग्राहक संघटनांची राज्यव्यापी बैठक संपन्न
    नाशिक इंडस्ट्रीज आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)तर्फे प्रतापराव होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक, व्यापारी, वीजग्राहक व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकार्‍यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या चर्चासत्रात वीजग्राहकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
या चर्चेमध्ये पुढील मुद्द्यांवर विचार मांडण्यात आले. आले. मुख्यत्वे महावितरण कंपनीची अकार्यक्षमता, महावितरणाची वीजगळती व होणारा भांडवली खर्च या सर्वांमुळे राज्य शासनाने जाहीर केलेली वीजदर सवलत हा उद्देश साध्य होत नाही. शासनाने जर महावितरण कंपनीची कार्यक्षमता वाढविली तर वीजचे उत्पन्न वाढेल व वीजदर कमी होण्यासही मदत होईल. तसेच वीज गळती थांबवली तर जवळ जवळ 7 ते 10 हजार कोटी रूपये पर्यंतचा खर्च आटोक्यात आणता येईल. महावितरण कंपनीचा भांडवली खर्च हा 700 कोटी रूपये वरून 4000 कोटी रूपये आलेला आहे, जर हा भांडवली खर्च महावितरण कंपनीने कमी केला तर निश्चितच वीजदर कमी होण्यात व त्यात सवलत मिळण्याचा फायदा औद्योगिक व वीजग्राहक संघटना यांना होणार आहे. तसेच महावितरण कंपनीचे अजय मेहता यांच्याकडून ऊर्जा खाते काढून घेऊन ते औद्योगिक व वीजग्राहक संघटना राज्य समन्वय समितीकडे द्यावे अशी मागणी या चर्चासत्रात करण्यात आली. याबाबतचे निवेदन समितीच्या वतीने शासनाला तसेच महावितरण आयोगाला देण्यात येणार आहे व येत्या 3 मार्च 2014 रोजी राज्यभर महावितरणाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
red   "नॅफकॅब'च्या अध्यक्षपदी डॉ. मुकुंद अभ्यंकर
    देशातील सहकारी बँका आणि पतसंस्था यांची शिखरसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील "नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लि.,' (नॅफकॅब)च्या अध्यक्षपदी कॉसमॉस बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर यांची तर विद्याधर अनास्कर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नवी दिल्ली येथे झालेल्या "नॅफकॅब'च्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत देशभरातील सहकारी बँका आणि पतसंस्थांचे जवळपास पाचशे प्रतिनिधी सहभागी झाले होते. संचालक मंडळाच्या मंडळाच्या एकवीस जागांसाठी झालेल्या मतदानात डॉ. अभ्यंकर यांना सर्वाधिक म्हणजे 391 पैकी 267 मते मिळाली. ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन यांना 245, तर इचलकरंजी कल्लप्पा आवडे सहकारी बँकेचे अध्यक्ष- अशोक सौंदत्तीकर यांना 205 मते मिळाली."नॅफकॅब' ही राष्ट्रीय पातळीवरील आघाडीची शिक्षरसंस्था असून या संस्थेची स्थापना सन 1990 मध्ये सारस्वत बँकेचे संचालक पी.डब्ल्यू. रेगे यांनी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच अध्यक्षपदाचा मान महाराष्ट्रातील व्यक्तीला मिळाला आहे.