मसालाकिंग - धनंजय दातार

DR DHANJAY DATARजिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात अनेक उद्योजक घडले आहेत. यातील काही मोजक्या उद्योजकांनी भारतातच नव्हे, तर जगातही आपल्या उद्योगाचे साम्राज्य निर्माण केले आहे. दुबईतील सुप्रसिद्ध ‘अल अदील’ समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. धनंजय दातार यांनी गेल्या ३३ वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणाऱ्या दातार यांनी आखाती देशांत ३९ सुपर मार्केट्सची स्वत:ची रीटेल आऊटलेट्सची साखळी निर्माण केली. त्याचबरोबर पिठाच्या दोन गिरण्या आणि मसाल्याचे दोन कारखानेही उभारले. त्यांची ‘अल अदिल ट्रेडिंग’ कंपनी आखाती देशांतील स्थानिक व भारतीयांच्या घराघरांत पोचली आहे.

उद्योजकीय वारसा अथवा आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी तरुण वयात व्यवसायाचे स्वप्न बघितले. मुंबईत फिनेल विक्रीचा व्यवसाय करताना विक्रीकला व ग्राहकसेवा कौशल्य आत्मसात केले. वडिलांनी दुबईत सुरु केलेल्या छोट्याशा दुकानात झाडू-पोछा, लादी सफाई, पोती वाहून नेणे अशा कामांतून कारकीर्दीची सुरवात केली. एका छोट्याशा व्यवसायाचे रुपांतर बहुराष्ट्रीय उद्योग समूहात करुन दाखवले. दुबईच्या शासकांनी धनंजय दातार यांना ‘मसालाकिंग’ बहुमानाने संबोधूनत्यांच्या परिश्रम आणि कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला आहे.
वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि परिणामकारक सेवा या त्रिसूत्रीच्या जोरावर ग्राहकांचे समाधान केल्यास नक्कीच यश मिळते, यावर डॉ. दातारांचा भर आहे. प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत, असा सल्ला ते तरुणांना देतात. हाच प्रामाणिकपणा दातार यांनी मागील ३३ वर्षे आपल्या व्यवसायात कायम ठेवला. यामुळे त्यांना भारताबरोबरच जागतिक स्तरावरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.‘फोर्ब्स मिडल ईस्ट’तर्फे नुकताच ‘टॉप इंडियन लीडर्स इन द अरब वर्ल्ड २०१८ – रीटेल अॅवॉर्ड’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. डॉ.दातार हे ‘फोर्ब्स मिडल ईस्ट’च्या आघाडीच्या १०० भारतीय नेत्यांच्या मानांकन यादीतील बहुधा एकमेव महाराष्ट्रीय आहेत. अरेबियन बिझनेस रँकमध्ये त्यांना १४ वे, तर फोर्ब्जच्या यादीमध्ये ३३ वे मानांकन मिळाले आहे.
डॉ. दातार यांनी विविध संस्थांना मदत करुन सामाजिक बांधीलकीही जपली आहे. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यात ते आघाडीवर आहेत. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते अधिकाधिक मदत करतात. त्यांना अलिकडेच मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. व्यवसायाचा व्याप सांभाळून डॉ. दातार उद्यमशील तरुणाईला प्रेरित करण्याच्या हेतूने उद्योजकीय मार्गदर्शन करतात.
‘अलअदील ट्रेडिंग’नेडॉ.धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली ९००० भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या‘पिकॉक’ या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत ७०० हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स’ या नावाने मुंबईत कार्यरत आहे. ‘अल अदील’ समूहाचे ३९ आऊटलेट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त२ पिठाच्या गिरण्या व २ मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा ‘मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने मुंबईत आहे. ‘अल अदील’ समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने नुकतीच दुबईसह ओमान, बहारीन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.