DAC MUV PICसोशल मीडिया वरील उलट सुलट चर्चांमुळे देशाची अर्थव्यवस्था नक्की सुधारत आहे कि नाही ह्याबद्दल शंका येऊ शकते आणि ती रास्तच म्हणावी लागेल. २०१७ - १८ ह्या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाहींचा आर्थिक वाढ दर हा अपेक्षेपेक्षा काहीसा कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. ह्या पार्श्वभूमीवर चौथ्या तिमाहीचा साडेसात हा आर्थिक वाढदार सर्वांनाच सुखावून गेला असेल ह्यात शंका नाही. नोटबंदी व GST च्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेची वाढ काहीशी खुंटल्यासारखी झाली होती. नोट बंदीची गरज होती का ? किंवा GST ची अंमलबजावणी ह्यापेक्षा चांगली होऊ शकली असती का ? ह्यावर तज्ज्ञ मंडळींमध्ये मतभेद आहेत व दोन्ही बाजूंचे काही मुद्दे पटण्यासारखे आहेत. मात्र एक गोष्ट नक्की, ह्या सर्वांवर मात करून आता देशाच्या अर्थव्यवस्थेने प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे. भारतीय बाजारपेठ हळूहळू का होईना पण विस्तारू लागली आहे. अर्थात ह्यात सिंव्हाचा वाटा भारतीय उद्योजकतेचा आहे हे कुणीही नाकारू शकत नाही.
कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होतच असतो. गेले काही महिने अमेरिका, उत्तर कोरिया,चीन व इतर काही देशांमधील वाद विकोपाला गेले होते. ह्याचा परिणाम साहजिकच जागतिक व्यापारावर झाला होता. पण हल्लीच सिंगापूर येथे झालेल्या ट्रम्प-किम भेटीमुळे वातावरण काहीसे निवळण्याची चिन्हे आहेत. ह्यावर्षी पाऊस सुद्धा वेळेवर सुरु झाला असून तो पुरेसा होण्याचे अनुमान आहे. ह्याचाही फायदा आपल्याला मिळू शकतो.
एकंदरीत येणारा काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल असेल असे संकेत सध्या तरी आहेत !