जगापेक्षा महाराष्ट्राचा विकास दर जास्त

Mundeजगातील १९३ देशांचा सध्याचा विकास दर हा ३ टक्के आहे. तसेच देशाचाही विकास दर कमी आहे. मात्र महाराष्ट्राचा यंदाचा विकास दर ७.३ टक्के इतका असून हा दर सध्याच्या काळात सर्वाधिक असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
विधानसभेत अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी राज्याचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. त्यावेळी ते बोलत होते.मागील १० वर्षात राज्याच्या कर्जाचे प्रमाण २१.२ टक्क्याच्या आसपास होते. सुदैवाने मागील तीन वर्षात यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून हे प्रमाण १६.६ टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे. त्याचबरोबर राज्याच्या सकळ उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी राज्याचे उत्पन्न २४ लाख ९५ हजार कोटी रूपये असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या दरडोई उत्पन्नातही १० टक्क्याने वाढ झाली असून गेल्यावर्षी १ लाख ६० हजारांवर असलेले दरडोई उत्पन्न यंदाच्यावर्षी १ लाख ८० हजारांवर पोहोचले आहे. दरडोई उत्पन्नात आपण कर्नाटक राज्याला मागे टाकल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.