मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन

                                                        - श्रीमती अश्विनी भिडे                           

Ashvini bhideआजची आपली मुंबई. धावपळीची आणि धकाधकीची. वाढत्या लोकसंखेचा ताण, अपु-या सुविधा, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि घड्याळ्याच्या काट्यावर चालणारं दैनंदिन जीवन यामुळे मुंबईत राहणं त्रासदायक होत चाललंय. वर्ल्ड लिव्हेबिलीटी इंडेक्सच्या उत्कृष्ट शहरांच्या यादीत मुंबईचा समावेश नाही. किंबहुना भारतातील कुठल्याही शहराचा नाही. ज्या वेगाने शहरं वाढतात त्याच वेगाने तिथल्या पायाभूत सुविधांचाही विकास व्हायला हवा या साध्या नियमाचं पालन न केल्यामुळे भारतातील अनेक शहरांना बेढब स्वरुप आलं आहे. रोजगार, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण यासोबतच दळणवळणाची साधने हे या सुविधांपैकी एक महत्वाचं अंग आहे. तथापि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मुंबई ही देशात नेहमीच अग्रक्रमात राहिली. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा आणि इच्छितस्थळी थेट नेणारी बससेवा यासोबतच रिक्षा आणि टॅक्सींचे पर्याय मुंबईकरांना उपलब्ध होतेच. त्यात एका नव्या पर्यायाची भर पडली ती मेट्रो रेल्वेची. ८ जून २०१४ रोजी वर्सोवा ते घाटकोपर ही मुंबईतील पहिली मेट्रो सुरु झाली आणि आमूलाग्र बदलाची ती नांदी ठरली. प्रवाश्यांच्या सोयीची आणि वाहतुकीवरील ताण कमी करणारी सेवा म्हणून मेट्रो रेल्वेचे महत्व वादातीत आहे. मुंबईकरांच्या मनात मेट्रो वन विषयी विशेष जागा निर्माण झालीय.

या पार्श्वभूमीवर रविवार १८ फेब्रुवारी रोजी, मेट्रो रेल्वे ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती अश्विनी भिडे यांचे या विषयावरील सादरीकरण, प्रबोधन मंच विलेपार्ले यांनी टिळक मंदिराच्या सावरकर प्रांगणात आयोजित केले होते. प्रशासकीय अधिकारी असलेल्या श्रीमती भिडे यांनी विविध पदे भूषविली आहेत. मुंबई मेट्रो रेल्वे ३ या प्रकल्पाविषयी त्यांची आस्था, विषयाचे सखोल ज्ञान आणि आव्हाने पेलून हे काम वेळेत पूर्ण करण्याचा आत्मविश्वास प्रत्ययास आला. कुलाबा - वांद्रे - सीप्झ या ३३.५ किमी लांबीच्या २७ स्थानके असलेल्या मुंबईतील पहिल्या भुयारी रेल्वेसाठी संपूर्ण टीम अथक परिश्रम घेतेय. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि उत्तम मनुष्यबळ आणि यंत्रबळाचा वापर केला जातोय. प्रकल्पाची सुविहीत आखणी, संभाव्य अडचणींचा विचार आणि त्यावरील उपायांची प्रभावी अंमलबजावणी यासोबतच देशातील तसेच परदेशातील तज्ज्ञांच्या आणि अभियांत्रिकी कंपन्यांच्या सहयोगाने सुरु असलेल्या मेट्रो रेल्वे ३ च्या वाटचालीची तपशीलवार माहिती श्रीमती भिडे यांनी दिली. आपण सामान्यतः ज्या कठीण परिस्थितीची कल्पना करु शकतो त्याहीपेक्षा खडतर आव्हानांचा सामना करत या आणि अशा इतर प्रोजेक्टचे काम सुरु आहे. या रेल्वेमार्गासाठी १३०० झाडे कायमची तर ३७०० झाडे तात्पुरत्या स्वरुपात तोडावी लागणार असली, ज्यामुळे ६१०० किग्रॅ कार्बन डायआक्साईड कमी शोषला जाईल परंतु हा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर इतर वाहनांमुळे होणारे प्रदूषण हे ९.९ दशलक्ष किग्रॅहून अधिक घटेल आणि म्हणूनच हा केवळ पर्यावरणपूरकच नव्हे तर संवर्धक प्रकल्प आहे.

बाहेरुन दिसणारी या प्रकल्पाची व्याप्ती ही हिमनगाचं केवळ एक टोक होय. मुंबईच्या पोटात साधारणत: ७५ फूट खोल आणि ३३ किमी लांब रेल्वेमार्ग तयार करणे हे अत्यंत गुंतागुंतीचं आणि कौशल्याचं काम आहे. जमिनीखाली असलेल्या पाईप्स आणि केबल्सच्या जाळ्याला धक्का न लावता मार्गक्रमण आवश्यक आहे. या रेल्वेचा काही भाग तर मिठी नदीच्या खालून गेला आहे तर इतर ठिकाणी मुंबईतील गजबजलेले भाग आहेत. त्याकरिता अजस्त्र मशिन्स, कुशल तंत्रज्ञ आणि शेकडो कामगार अहोरात्र राबताहेत. ध्वनी आणि वायूप्रदूषण होऊ नये म्हणून काही नाॅर्म्स आखून दिले आहेत. मुंबईकरांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता मेट्रो रेल्वे ३ ही जून २०२१ पर्यंत सुरु करण्याचा मानस आहे. त्यावेळी रोज १४ लाख प्रवासी यातून प्रवास करतील आणि पुढे जाऊन ही संख्या रोज १७ लाख प्रवासी इतकी वाढेल. जिका (JICA) या जपानी कंपनीकडून ४५% अर्थसहाय्य तसेच हाँगकाँग, जपान आणि अमेरिकेकडून तांत्रिक सहकार्याला भारतीय बुद्धिमत्ता आणि परिश्रमांची जोड देऊन हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे.

या प्रकल्पासाठी करावे लागणारे भूसंपादन, त्यासाठी होणारे विस्थापन आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, त्याला दिला जाणारा राजकीय आणि सामाजिक रंग, पर्यावरण आणि इतर बाबींसाठी लागणा-या असंख्य परवानग्या, जनतेचे वारंवार करावे लागणारे समुपदेशन ही याची आणखी एक संवेदनशील बाजू. तांत्रिक गोष्टींसोबतच या तरल गोष्टीसुद्धा हाताळाव्या लागतात, त्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो आणि लोकांच्या सकारात्मक पाठिंब्याची वाट पहावी लागते. ही सर्व आव्हाने समर्थपणे पेलत निर्धारित वेळेत मेट्रो रेल्वे ३ सुरु होईल याची खात्री असल्याचे श्रीमती भिडे यांनी नमूद केले. पार्लेकरांकडून या प्रकल्पाकरिता काय हवे असे विचारता केवळ तुमच्या शुभेच्छा द्या म्हणजे आम्हाला या कामाकरिता अधिक बळ मिळेल असे भावनिक उत्तर त्यांनी दिले. समस्त पार्लेकरांतर्फे मेट्रो रेल काॅर्पोरेशनला मन:पूर्वक शुभेच्छा आणि हा नेटका कार्यक्रम सादर केल्याबद्दल प्रबोधन मंच, विलेपार्ले यांचे आभार.

@ पराग खोत

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division