'MACCIA'तर्फे लघुउद्योजकांसाठी परिषद संपन्न

'MSMEक्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र चेंबरच्या सूचनांमध्ये जातीने लक्ष घालीन.' सुभाष देसाई, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य.

DSC 0954सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे समजले जाते. या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पनांचा समावेश करून उद्योगाचा विस्तार कसा करावा याविषयी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या वतीने दि.२२ ऑगस्ट रोजी मुंबई येथे ROARING MSMEs – INNOVATION FOR A GLOBAL FOOTPRINT' या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्याचे औद्योगिक मंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात 'महाराष्ट्रातील लघुउद्योगक्षेत्रावर सुरुवातीपासूनच मी जास्त लक्ष देत आहे तसेच अशा उपक्रमांमधून जी चर्चा होईल, शासनाकडे ज्या सूचना केल्या जातील त्यांच्यावर काम करून राज्याच्या औद्योगिक विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी मी बांधील आहे' अशी ग्वाही उपस्थित उद्योजकांना दिली. इतर राज्यांकडून होणाऱ्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी शासनातर्फ कुठली पावले उचलली जात आहेत हेही त्यांनी विस्ताराने सांगितले. कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या 87 वरून सुमारे 25 पर्यंत घटवण्यात शासनाला मिळणारे यश, परदेशातील मोठ्या कंपन्यांना महाराष्ट्रात उद्योग करणे सुलभ व्हावे यासाठी केले जाणारे प्रयत्न याविषयीची माहिती अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी विशद केली. मोठ्या उद्योगांना सहाय्य करणारी MAITRI (महाराष्ट्र इंडस्ट्री, ट्रेड अॅण्ड इन्वेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल) ही संस्था आता MSME उद्योगांनाही सहाय्य करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.

DSC 0976महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राचा आढावा घेताना त्यांनी शेंद्रा-बिडकिन प्रकल्प, महिला उद्योजिकांसाठीच्या योजना, आजारी उद्योगांसंबंधीची धोरणे, शैक्षणिक संस्थांच्या मदतीने नवे उद्योजक घडवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न अशा सर्व गोष्टींबद्दल विसृत माहिती दिली. नंतर त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. चेंबरच्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्व सूचनांना तसेच उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

उद्घाटनाच्या सत्रात चेंबरचे अध्यक्ष शंतनु भडकमकर यांनी परिषदेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. प्रमुख वक्ते व 'डेटामॅटिक्स'चे चेअरमन डॉ.ललित कनोडिया यांनी औद्योगिक विकासात MSME क्षेत्राचे महत्त्व विशद करताना सांगितले की, "ब्रिक्स देशांमध्ये भारत हा एकमेव देश आहे ज्याचा विकासदर ७.५% आहे साहजिकच आपल्याबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. भारतासारख्या देशात दरदिवशी लाखो रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे आणि इतक्या मोठया प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याचे बळ केवळ लघुउद्योगांमध्ये आहे. या क्षेत्रामध्ये योग्य कौशल्यांचा विकास घडवून आणण्यासाठी, संशोधन व दर्जेदार तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी परदेशातील तज्ञांची मदत घेण्यात काहीच गैर नाही. आपल्याकडे देशभरात IITs च्या स्थापनेसाठी अशा प्रकारे युरोपियन व अमेरिकन शिक्षणसंस्थांचे मार्गदर्शन घेण्यात आले होते. नविन कल्पनांसाठी लघुउद्योगक्षेत्रात भरपूर वाव असतो त्याला प्रोत्साहन देण्याची, गरजेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची व त्यांच्या समस्यांची योग्य दखल घेण्याची आवश्यकता आहे.'

या सत्राचा समारोप करताना चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सांगितले की,'औद्योगिक योजना, शासनाची धोरणे तयार करताना नेहमी मोठ्या उद्योगांना डोळ्यांपुढे ठेवले जाते, ज्यांचा एकूण उद्योगक्षेत्रातील वाटा MSME क्षेत्राच्या मानाने खूप कमी आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.'

यानंतर अजय ठाकूर यांनी 'BSE-SME Exchange' द्वारे लघुउद्योगांना प्राप्त होणाऱ्या गुंतवणूक संधींची माहिती दिली. नवीन युगात मार्केटिंग आणि बॅंडिग हे परवलीचे शब्द झाले आहेत. आपल्या उत्पादनाला जास्तीत जास्त बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. क्रॉसलिंक इंटरनॅशनलचे CEO डॉ.नितीन परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सत्रात व्यंकटेश अय्यर (CMD गोली वडापाव), झेलम चौबळ (संचालक, केसरी टूर्स), डॉ. राजा राय चौधरी (असोसिएट प्रो.SPJIMR), व रिझवी मॅनेजमेंट इंस्टिट्युटचे सायरस गोंडा सहभागी झाले होते.

’पारंपारिक पद्धतींना छेद देणारे कल्पनाविष्कार आणि MSME उद्योगांमध्ये त्यांचे वाढते स्थान व महत्त्व या विषयीच्या चर्चासत्रात माला सिंग ( MD पीईसी ग्रिनींग इंडिया), सद्गगुरू श्री श्री साखर कारखान्याचे मार्केटिंग प्रमुख रोहित नारा, इकोसेंट्रिकचे CEO करण ठक्कर व बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सचे प्रमोद कृष्णमूर्ती यांनी प्रेझेंटेशन सादर केले.

तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगामध्ये लघुउद्योजकांनी कुठली कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे हेदेखील या परिषदेच्या माध्यमातून चर्चिले गेले. या सत्रात सुदीप घोसे (VP व्हिआयपी इंडस्ट्रिज), बॉम्बे स्टोअरचे शमिक वोरा, बिर्ला सनलाईफचे प्रणव शर्मा, एम्बसी बुक्सचे CEO सोहिन लखानी व अॅटम टेक्नॉलॉजीचे MD देवांग नेरला यांनी चर्चा केली.