'आविष्कारांचे अभिसरण'

- डॉ. नरेंद्र जोशी

plmanddiffusion"नवीन विचार, नवीन परिमाण किंवा नवीन विचारदर्शन (a new order of things) याहून अधिक योजनेस कठीण, यशाबद्दल साशंक व व्यवस्थापनास धोकादायक असे काहीच नाही... म्हणूनच सर्जका वर (innovator) यथावकाश व यथाशक्ती हल्ले करायला त्याचे शत्रू प्रचंड आवेशाने सज्ज असतात आणि त्याचे "पाठीराखे' आपला पाठिंबाही मोजका ठेवतात जेणेकरून सर्जकाचे स्थान स्खलनशील, डळमळीतपणात लपेटून राहते.' अशा आशयाचे चपखल वाक्य मेकीयावेलीने "प्रिन्स' या आपल्या प्रसिद्ध ग्रंथात पेरले आहे. कधीकधी अशा सर्जकांना आपली निर्मिती प्रत्यक्षात यायला अनेक वर्षे वाट पहावी लागते. एवरेट रॉजर्सने त्याच्या Diffusion of innovations ("सृजनाचे अभिसरण') या पुस्तकात याची उदाहरणे दिली आहेत.

पेरू देशातील एका छोट्याश्या गावात सामाजिक आरोग्यविषयक काम करणार्‍या एका खात्याने एक नवीन कल्पना/ सृजन अंमलात आणायचे ठरवले. तेथील रोगराईवर "पाणी उकळून प्या व आपले आरोग्य राखा' असा अगदी सोपा उपाय त्यांनी सुचवला. केवळ दोनशे कुटुंबाच्या या गावात सलग दोन वर्षे हा जनजागृतीचा उपक्रम राबवला गेला. तोही अगदी प्रामाणिक कळकळीने. पाण्यासाठी एक डबके, लांबवर असलेली एक विहीर व एक नाला यावर गावकरी अवलंबून होते. पाण्याचे हे तिन्ही स्त्रोत दूषित व गावात रोगराईचे प्रमाण खूप त्यामुळे उकळून पाणी पिणे या उपायावर काहीच दुमत व्हायला नको होते. पण घरटी २५ वेळा किमान चर्चा वगैरे करूनही दोन वर्षानंतर फक्त ११ कुटुंबांनी पाणी उकळायला सुरुवात केली. हे मोठे अपयश होते. या अनास्थेमागे काय कारण असावे याचा शोध घेतला असता लक्षात आले की या गावाला एक सामाजिक व सांस्कृतिक परंपरा व त्यामधील रूढी होत्या. उकळून पाणी पिण्याचा सल्ला देताना ही महत्त्वाची गोष्ट नजरेआड झाली. गरम व थंड या साध्या शब्दांनाही त्यांच्या परंपरेत संदर्भ होता. गरम पाणी वा अन्न खाणे हे आजारीपणाचे द्योतक होते आणि त्यामुळे उकळलेले पाणी प्यायला देणे म्हणजे जणू आजारी पडण्यापूर्वीच कुटुंबियांना आजारी घोषित करणे ठरले असते. साहजिकच याला मोठा विरोध होता. उकळलेले पाणी सुगंधी/ रुचिर (flavoured) करूनच प्यावे असा अलिखित, अघोषित नियम होता. ज्यांच्यासाठी काम करायचे त्या समाजाशी संभाषण न करता, त्यांच्या संकल्पना, प्रथा यांच्याशी समरस न होता सुचवण्यात आलेला तो उपाय होता. "बाहेरच्या" कुणीतरी लादलेली ती कल्पना होती आणि म्हणून ती कोलमडली. 

दुसरे उदाहरण द्यायचे तर वास्को-द-गामा १६० खलाशी घेऊन निघाला त्यातले १०० वाटेतच स्कर्व्ही रोगाने दगावले. तेव्हापासून व पूर्वीही स्कर्व्ही हा खलाशी/ Navy साठी सर्वात मोठा शत्रू समजला जातो. १६०१ साली एका संशोधकाने यावर उपाय काढला जो पुढची १५० वर्षे उपयोगात आला नाही. त्यानंतर British Navy ने यावरून पुढे जात Citrus Fruits, संत्र, लिंबू यांनी हा रोग आटोक्यात येतो हे सप्रमाण सिद्ध केले. हेही पुढची पन्नास वर्षे बासनात गुंडाळले गेले. १७९५ साली याचा उपयोग झाला व अनेकांना जीवनदान मिळाले. आणखी सत्तर वर्षे गेली त्याची अधिकृत मान्यता यायला! याच कालावधीत त्याच British Navy ने अनेक आविष्कार/ नवीन संकल्पना स्विकारल्या. अद्ययावत तंत्रज्ञान व उपकरणे उपयोगात आणली पण संत्र, लिंबू हा किंवा तत्सम vinegar इ. उपाय यायला इतका उशीर झाला!

आपण सर्व टाइपरायटर व कॉम्प्युटर वापरतो त्याचा कीबोर्ड "Qwerty' कीबोर्ड असतो. ख्रिस्तोफर शोलने हा कीबोर्ड शोधला तेव्हा टाइपरायटरची (१८७३ AD) रचना वेगळी होती. प्रत्येक अक्षर दाबले की एक वर्तुळाकार लिंक वळायची व त्याच्या दुसर्‍या टोकाला एक ठसा असे जो शाईच्या रिबीनवर प्रहार करी. जेणेकरून अक्षर कागदावर उमटे. वेगात टाईप केले तर या लिंक एकमेकांत गुंतल्या जात व काम थांबे. यामुळे शोलने अशी अक्षररचना केली ज्याने वेग मर्यादित राहील व गुंतणे कमी होईल. हा कीबोर्ड वस्तुतः किचकट व कमी उपयुक्त आहे आणि म्हणून ड्वोराक या संशोधकाने याहून चांगल्या रचनेचा कीबोर्ड शोधला. दरम्यान उपकरणातील जटिलता कमी होत गेली होती व वेग कमी करून "गुंता' होऊ न देणं याची गरज संपली होती. तरीही आणि अगदी आजही Electronic Typing, PC, Touchscreen या सर्वांसाठी लिंकचा गुंता हा प्रश्न कालबाह्य झाल्यावरही, ड्वोराकचा किबोर्ड वापरला जात नाही आणि शोलचा Qwerty तसाच आहे!! आताही हा लेख Qwerty वरच टाईप होईल व एकदा आपला Smart Phone जरा पहा, Touchscreen वर तुमची बोटं Qwertyuiop नेच टाईप करणे नकळतपणे सुरू करतील.

कोणत्याही सृजनाचे- आविष्काराचे खालील घटक असतात.rogers 2003 p11

१. प्रत्यक्ष सृजन
२. विविध माध्यमाद्वारे त्याबद्दलचे माहिती प्रसारण- संभाषण
३. वेळ जाणे (अभिसरण)
४. ज्या समाजाला वा समाजगटाला हे सृजन उपयोगात आणायचे आहे. त्यांचा या प्रक्रियेतील सहभाग व सार्वत्रिकीकरण...

या सर्व प्रक्रियेला "सृजनाचे अभिसरण' म्हणजेच Diffusion of Innovation असे म्हणतात. ते असे होते...

१. Early Adapters- लवकर स्विकार करणारे १५-२०%
२. Take off- उड्डाण ६०-७०%
३. Late adapters- उशिरा स्विकार करणारे १५-२०%

S Curve1या ग्राफप्रमाणे अविष्काराला आल्याआल्या उचलून धरणारे थोडे असतात, नंतर काही काळाने खर्‍या अर्थाने त्याचे उड्डाण होते व काहीजण आगदी शेवटीशेवटी ती कल्पना स्विकारतात. तोवर एखादे दुसरे आविष्कार/ सृजन झालेलेसुद्धा असते.

०- Innovators
१- Early adopters
२- Early majority, Late majority
३- Late adopters/ Leggards

(०) कुठल्याही व्यवस्थेत सर्जक Innovators अगदी थोडे असतात (२.५%) त्यासाठी जटिलतेची (complexity) आवड, निर्मितीचे व्यसन, आर्थिक सुस्थिती, अनिश्चिततेशी जुळण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी लागतात.

(१) Early adopters ही १३-२०% माणसे असतात. हे प्रादेशिक गटनेत्यांसारखे असतात. काही नवीन निर्मिले नाही तरी नवीन गोष्टी घेण्याची, अनुभवण्याची त्यांना हौस असते. ही माणसे इतरांना अनुकरणीय असतात. "Change Agent' म्हणून ती काम करतात. 

(२) त्यानंतर आहेत Early majority नंतरचे ३०-४०% (३४% काहींच्या मते) आणि Late majority (३४%) ही दोघे पहिल्यापेक्षा जरा कमी पण शेवटी राहण्यापेक्षा थोडे बरे असे असतात. ही माणसे "आपण फार पुढे जाऊ नये, फार मागेही राहू नये... कोणाच्यातरी सावलीत गुपचुप पुढे जावे व सुरक्षित राहावे' अशी असतात. यादरम्यान सृजनातील असुरक्षितता व धोके गेलेले असतात.

(३) शेवटी येतात ते Late adopters/ Leggards- १६-२०% यांना काहीच मत नसते. भूतकाळ व एकलेपणा, बाह्याबदलांशी तुटलेपण यात ते रमलेले. ही बिचारी चाकोरीतली माणसे... बदल त्यांना धोका वाटतो त्यांच्या मर्यादांमुळे तसे त्यांचे वागणे बरोबरच असते. Knowledge, Persuation, Decision, Implementation, Confirmation असे हे चक्र आहे.

Knowledge, Persuation, Decision, Implementation, Confirmation असे हे चक्र आहे. म्हणजेच एखाद्या वस्तूबद्दल/ अविष्काराबद्दल ज्ञान होणं, त्याची आवड वाटणं/ त्याबद्ल मनाची तयारी होणं, त्याबद्दल निर्णय होणं, त्या निर्णयाची अंमलबजावणी होणं, आपल्या या निर्णयाबद्दल अनुभवाने तो योग्य होता अशी खात्री पटणं अशा यातल्या पायऱ्या आहेत. उदाहरणार्थ, SONY च्या नवीन TV मध्ये Android App आहेत हे आपल्याला एव्हाना माहित आहे, पण तेवढी आवड नाही. विकत घेण्याचा निर्णय अजून झाला नाही. पण काही १३-१५%मुंबईकरांनी तो विकत घेतलाही असेल. हळूहळू त्यांचे पाहून इतरही करतील. असाच वेळ जाईल आणि शेवटी १३-१५% लोक उपायच नाही म्हणून तो TV घेतील. दरम्यान SONY कधीच पुढचे मॉडेल घेऊन तयार असेल! ही आहे अभिसरणाची प्रक्रिया व त्यातील जटिलता. म्हणूनच प्रत्येक आविष्कार यशस्वी नसतो तसेच कुठलाच आविष्कार क्षुद्र नसतो!