‘एलआयसी’च्या अध्यक्षपदी व्ही. के. शर्मा यांची नियुक्ती
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) च्या अध्यक्षपदी विजय कुमार (व्ही. के.) शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहणारे शर्मा यांची नियक्ती ही पुढील पाच वर्षांसाठी असेल.
महामंडळाचे एस. के. रॉय यांनी निवृत्तीला दोन वर्षे शिल्लक असतानाच जून २०१६ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्तच होते. तर व्यवस्थापकीय संचालकपद असलेले शर्मा १६ सप्टेंबरपासून अध्यक्षपदाचा कार्यभार पाहत होते.
१९८१ मध्ये अधिकारी म्हणून महामंडळात रुजू झालेले शर्मा २०१३ मध्ये व्यवस्थापकीय संचालक बनले. कंपनीच्या दक्षिण परिमंडळाचे ते व्यवस्थापकही राहिले आहेत. एलआयसी समूहातील एलआयसी हाऊसिंग फायनान्स या गृहवित्त कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
एकूण आयुर्विमा योजनांमधील ७५.४८ टक्के बाजार हिश्श्यासह कंपनी २२ लाख कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन पाहते. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत ४०,००० कोटी रुपयांचा नफा कमाविला असून मार्च २०१६ अखेरचे कंपनीचे एकूण उत्पन्न ४.३१ लाख कोटी रुपये नोंदविले आहे.