‘फिक्की’ च्या संचालकपदी ललित गांधी यांची निवड
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (फिक्की) या देशातील उद्योग- व्यापार क्षेत्राच्या सर्वात मोठ्या शिखर संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत ‘वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रो अॅण्ड एज्युकेशन’ (वेसमॅक) च्या चे अध्यक्ष व ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे उपाध्यक्ष ललित गांधी सर्वाधिक मतांनी विजयी झाले.
देशातील विविध उद्योग व व्यापारी फ्गाताकांच्या राष्ट्रीय शिखर संस्था सभासद असलेल्या संस्था गटातून झालेल्या निवडणुकीत ललित गांधी यांनी विजय प्राप्त केला.
‘फिक्की’ च्या ८९ व्या वार्षिक सभेप्रसंगी ही निवडणूक संपन्न झाली. वार्षिक सभेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, नागरी उड्डयनमंत्री जयंत सिन्हा, कौशल विकास मंत्री राजीवप्रताप रुडी, प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, फिक्की चे नवनिर्वाचित अध्यक्ष व कॅडीला हेल्थकेअर चे चेअरमन पंकज पटेल, मावळते अध्यक्ष व उद्योगपती हर्षवर्धन नेवोटीया, महाराष्ट्र चेंबर चे अध्यक्ष शंतनु भडकमकर, खासदार दिलीप गांधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह देशभरातील उद्योग जगतातील मान्यवरांनी ललित गांधी यांना निवडीसाठी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
फिक्की सारख्या प्रमुख राष्ट्रीय शिखर संस्थेवर संचालकपदी काम करण्याची संधी मिळणे हा मोठा सन्मान असल्याचे सांगून ललित गांधी यांनी देशाच्या अर्थविषयक व उद्योग विषयक धोरण ठरविण्यात प्रमुख भूमिका बजावणार्या ‘फिक्की’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष पुढाकार घेऊ असे सांगितले.
मुंबई- पुणे वगळता उर्वरित महाराष्ट्रातून ‘फिक्की’ वर काम करण्याची संधी ८९ वर्षात प्रथमच ‘कोल्हापूर’ ला मिळाली याचा विशेष आनंद असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.