स्टार्ट अप इंडिया
युवा वर्गातील उद्योजकतेला तळागाळापर्यंत नेण्यासाठी ‘स्टार्ट अप इंडिया’ या अभियानाची जोरदार सुरूवात करून सरकारने उद्योगस्नेही वातावरणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. लालफीतशाही, धोरणांबाबत असलेला उदासीनपणा यामुळे आपल्याकडे उद्योजकता रुजण्यात अनेक अडचणी येतात. उद्योजकता फोफावण्यासाठी त्यातील सरकारी हस्तक्षेप कमी असावा आणि सरकारने फक्त उद्योगस्नेही वातावरणनिर्मितीकडे लक्ष केंद्रित करावे अशा सूचना युवा उद्योजकांकडून येत होत्या. स्टार्टअपविषयीच्या कृतिआराखडय़ावरून शासन या क्षेत्रासंबंधी गंभीर, सकारात्मक आणि कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे.
स्टार्ट अपची ठळक वैशिष्ट्ये:
• दहा हजार कोटींचा राखीव निधी – स्टार्टअप उद्योगाच्या विकास आणि वृद्धीसाठी सरकारतर्फे सुरुवातीला व्हेंचर कॅपिटलसाठी २५०० कोटी तर येत्या चार वर्षांत दहा हजार कोटींचा राखीव निधी उपलब्ध केला जाईल.
• स्टार्टअप इंडिया हब – स्टार्टअपविषयीच्या संपर्कासाठी आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी हबची निर्मिती.
• सोपी आरंभ प्रक्रिया – केवळ एक फॉर्म भरून कोणालाही सुरुवात करता येईल. त्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि ऑनलाइन पोर्टलची सुरुवात
• स्वामित्व संरक्षण – आपल्या उद्योगाच्या स्वामित्व अर्जाचे निर्णय जलदगतीने घेतले जातील. शिवाय बौद्धिक संपदा हक्कांच्या प्रक्रियेविषयी सरकार पारदर्शक धोरण राबवणार. स्वामित्व अर्ज भरताना ८० टक्क्यांचे रिबेट
• करसवलत – स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि नफावृद्धीसाठी १ एप्रिल २०१६ नंतरच्या स्टार्टअप्सना तीन वर्षांच्या कालावधीपर्यंत करमुक्ती
• कामगार व पर्यावरणविषयक कायद्यांच्या बडग्याऐवजी स्वनियमनावर भर
• चार वर्षांहून कमी काळापूर्वी सुरू झालेल्या नव्या उद्योगांचा समावेश
• २५ कोटी रुपयांहून कमी वार्षिक उलाढाल असलेल्या उद्योगांचा समावेश
• नवीन तंत्रज्ञानाचा आणि बौद्धिक संपदेचा उपयोग - आपल्या सेवा व उत्पादनांसाठी नव्या कल्पनांचा वापर व नवीन तंत्रज्ञानाद्वारे उत्पादनांचा विकास आणि व्यापारीकरण
• देशभरातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये इनक्युबेटर्स, थिंकिंग लॅब्ज्ची स्थापना
• राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कल्पक उद्योगाला/उद्योजकासाठी पुरस्कार
• ‘स्टँड अप इंडिया’ अभियानांतर्गत महिला आणि अनुसूचित जातीजमातींतील उद्योजकांना विशेष प्रोत्साहन आणि मदत
स्टार्ट अप उद्योग हा चांगल्या कल्पनेतून जन्माला येत असतो. मात्र तेवढेच पुरेसे नाही तर त्याची अंमलबजावणी चोख असली पाहिजे. नाहीतर चुकीच्या पद्धतींमुळे, सखोल अभ्यासाअभावी चांगल्या कल्पना वाया जाऊ शकतात किंवा उत्साहात सुरू झालेले स्टार्ट अप्स अर्ध्यातच बंद होऊ शकतात. तसे होऊ नये यासाठी उद्योजकाने काही बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
स्पर्धा आणि बाजारपेठ अभ्यासआपण जे करणार ते नावीन्यपूर्ण आहे का आणि नसेल तर त्यात पूर्वीपेक्षा वेगळे काय असेल जेणेकरून ग्राहक आपल्याकडे वळतील, याचा निश्चित विचार व्हायला हवा. समान क्षेत्रातील इतर उद्योगांवर लक्ष असावे, त्यांच्यापेक्षा आपल्या सेवेचा, उत्पादनाचा दर्जा कैक पटींनी चांगला असणे आवश्यक आहे. जर आपली कल्पनाच नवी असेल आणि त्यावर कोणी विचार, काम केलेच नसेल तर बाजारपेठेत मक्तेदारी निर्माण करण्याची सुसंधी मिळते. आता बाजारपेठेचा इतका सखोल विचार एकतर अभ्यासपूर्वक स्वत:ला करावा लागतो किंवा त्यासाठी व्यावसायिक कंपन्यांची मदत घेता येते. त्यासाठी ज्यांच्याकडे सुरुवातीलाच चांगले भांडवल आहे त्यांना पसे देऊन बाजारपेठेचा अभ्यास करता येतो किंवा वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त लोकांशी बोलणे, वेगवेगळ्या अभ्यासगटांत, समविचारी वर्तुळांत सहभागी होणे, विश्वासार्ह संकेतस्थळांवरून माहिती गोळा करणे या मार्गानी शक्य होते.
आपला ग्राहक ओळखणे
आपल्या स्टार्ट अपचा अपेक्षित ग्राहक कोण आहे, हे माहीत असणे आवश्यक आहे. ग्राहकांची गरज, आवडनिवड लक्षात घेऊन त्याला अनुसरून आपली सेवा किंवा उत्पादन असावे. आपल्या सेवेमुळे किंवा उत्पादनामुळे ग्राहकाला काय फायदा होणार आहे, त्याला ते किफायतशीर किमतीत कसे मिळेल, हा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहकांचा वयोगट, व्यवसाय, आर्थिक स्तर इत्यादी गोष्टींची माहिती असावी. संभाव्य ग्राहकांशी बोलून आपल्या सेवा किंवा उत्पादनावर त्यांचा मिळणारा अभिप्राय प्रगतीसाठी उपकारक ठरतो.
उत्पादनाचे प्रोटोटाइप तयार करणे
काही स्टार्ट अप्स हे एखाद्या नव्या उत्पादनाशी निगडित असतात. त्यासाठी आवश्यक असतो प्रोटोटाइप. त्याच्या बळावर भांडवल, गुंतवणूकदार मिळवणे सोपे होते. ज्या मूळ कारणामुळे स्टार्ट अप सुरू केलाय ती समस्या प्रोटोटाइपमुळे सोडवली जातेय का हे पाहणे गरजेचे आहे.
एकदा का कल्पना सुचली की ती कागदावर मांडावी. तिच्यावर विचार करून आपली निरीक्षणे मांडावीत. कारण नुसती कल्पना सुचून महत्त्वाचे नाही तर तिला निश्चित दिशा येण्यासाठी उद्योग आराखडा तयार करावा. पुढे कंपनी स्थापन करावी लागते, त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता होणे गरजेचे असते. यासाठी कोणीतरी अनुभवी मार्गदर्शक आवश्यक असतो. एकूणच काय तर स्टार्ट अप उद्योगाची संकल्पना सुचण्यापासून ती प्रत्यक्षात येण्यापूर्वीपर्यंतचा हा प्रवासही खूप काही शिकवणारा आहे.