तेराशे बँक शाखांच्या आयएफएस कोडमध्ये बदल

SBIस्टेट बँक ऑफ इंडियाने पाच सहयोगी बँकांच्या विलिनीकरणानंतर सुमारे १३०० बँक शाखांची नावे आणि ‘इंडियन फायनान्शिअल सिस्टीम कोड’ (आयएफएससी) बदलले आहेत. स्टेट बँक ऑफ बिकानेर, जयपूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, भारतीय महिला बँक या बँका या वर्षी एप्रिल महिन्यात स्टेट बँकेमध्ये विलीन झाल्या.

मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ अशा मुख्य शहरांतील स्टेट बँकेच्या शाखांचा यामध्ये समावेश आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) प्रवीण गुप्ता म्हणाले, ‘आमच्या सहयोगी बँका एसबीआयमध्ये विलीन झाल्या आहेत. या विलिनीकरणानंतर आता या बँकांच्या शाखांचे आयएफएससी बदलले गेले आहेत. आयएफएससी बदलल्याची माहिती ग्राहकांना देण्यात आली असून अंतर्गत पातळीवरही कोड बदलण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. जुन्या कोडचा वापर करून कुठे व्यवहार केला गेला असेल, तर असे व्यवहार नव्या कोडशी संलग्न करण्यात येत आहेत. विलिनीकरणानंतर स्टेट बँकेच्या आता २३ हजार शाखा झाल्या आहेत. बँकेने जुन्या, नव्या शाखांची नावे आणि त्यांचे आयएफएससी वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहेत.

आयएफएससी हा अकरा आकडी अल्फा-न्युमरिकल कोड असतो. रिझर्व्ह बँकेच्या नियमित निधी हस्तांतर प्रक्रियेमध्ये सहभागी सर्व बँकांना आणि शाखांना हा क्रमांक दिला जातो. एनईएफटी, आरटीजीएस किंवा आयएमपीएस पद्धतीने एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी आयएफएससीचा उपयोग होतो.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division