‘महिंद्र’चा उत्पादनबंदीचा निर्णय!
आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्र अॅयण्ड महिंद्रने काही दिवस आपल्या वाहन व ट्रॅक्टर निर्मिती प्रकल्पातील उत्पादन काही दिवसांसाठी थांबविण्याचा निर्णय अलिकडेच जाहीर केला. निश्चलनीकरणाने वाहन बाजारपेठेतील मागणी मंदावल्याने, रेनॉ-निस्सान या अन्य निर्मात्यांनी यापूर्वीच उत्पादन कपातीचा मार्ग पत्करला आहे.
निश्चलनीकरणाच्या परिणामी वाहनांच्या विक्रीला जबर तडाखा बसल्याचे, नोव्हेंबर महिन्यातील एकूण विक्रीतील २१.८५ टक्क्य़ांच्या घसरणीने स्पष्ट केले आहे. विशेषत: ग्रामीण भाग नोटाबंदीने होरपळून निघाला असून, रब्बीच्या पेरण्या सुरू होत असताना ट्रॅक्टरच्या विक्रीत २१ टक्क्य़ांची घट या महिन्यांत दिसून आली. या पार्श्वभूमीवर कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवदेनात, उत्पादित वाहन साठा समायोजित करण्यासाठी चालू महिन्यात काही दिवस उत्पादन बंद ठेवत असल्याचे कळविले आहे. वार्षिक देखभालीसाठी नियोजित उत्पादनबंदीला जोडूनच हे दिवस निश्चित केले जाणार आहेत.
महिंद्रच्या उपकंपनीद्वारे पुण्यानजीक चाकण येथे चालविल्या जाणाऱ्या प्रकल्पासह, देशातील चारचाकी, दुचाकी व ट्रॅक्टर निर्मितीच्या सर्व उत्पादन केंद्रांमध्ये ‘ना उत्पादन दिन’ काही दिवसांसाठी डिसेंबरअखेपर्यंत पाळले जातील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
निस्सान, रेनॉ या विदेशी निर्मात्यांनीही आपल्या प्रकल्पांमध्ये एका पाळीतच उत्पादन घ्यायला आधीपासूनच सुरुवात केली आहे. रोखमर्यादेच्या स्थितीत लवकर सुधार दिसत नसताना आणि मागणी रोडावल्याच्या पाश्र्वभूमीवर अन्य कंपन्यांकडून उत्पादन कपातीचे अनुकरण येत्या काही दिवसांत केले जाण्याचे दाट संकेत आहेत.