निश्चलनीकरण निर्यातीसाठी फायद्याचे!
निश्चलनीकरण कालावधीत देशाची निर्यात २.२९ टक्क्यांनी वाढून २० अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात निर्यात क्षेत्राने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
नोव्हेंबरमधील निर्यातीत पेट्रोलियम, अभियांत्रिकी, रसायन उत्पादने क्षेत्राची कामगिरी उंचावली आहे. पैकी अभियांत्रिकी क्षेत्राची निर्यात १४.१० टक्के तर पेट्रोलियम पदार्थाची निर्यात ५.७३ टक्क्यांनी वाढली आहे. देशातील रसायन निर्यात क्षेत्राची कामगिरी ८.३० टक्क्यांनी वाढती राहिली आहे.
नोव्हेंबरमध्ये आयात मात्र तब्बल १०.४४ टक्क्यांनी वाढल्याने व्यापार तुटीवरील भार वाढला आहे. गेल्या महिन्यात ३३ अब्ज डॉलरची आयात झाली आहे. परिणामी व्यापार तूट १३ अब्ज डॉलपर्यंत पोहोचली आहे.
आयातीमध्ये गेल्या महिन्यात तेल आयात ५.८९ टक्क्यांनी वाढून ६.८३ अब्ज डॉलर झाले आहे. तर बिगरतेल उत्पादक पदार्थाची आयात ११.७० टक्क्यांनी वाढून २६.१८ अब्ज डॉलर झाली आहे.
चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबर या दरम्यान निर्यात अवघ्या ०.१० टक्क्याने वाढत १७४.९२ अब्ज डॉलर झाली आहे. तर आयातीत ८.४४ टक्के घसरण होऊन ती २४१.१० अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे निर्यात-आयातीतील दरी मानली जाणारी व्यापार तूट ६६.१७ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.
डिसेंबर २०१४ पासून सातत्याने १८ महिने घसरणारी निर्यात मे २०१६ पर्यंत कायम होती. जूनमध्ये काहीशी वाढ नोंदविल्यानंतर निर्यात पुन्हा जुलै व ऑगस्टमध्ये घसरली. मात्र यापूर्वीच्या दोन महिन्यांमध्ये, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये ती वाढली होती. नोव्हेंबरमध्येही हाच कल कायम राहिला.