अॅीक्सिस बँकेची संशयास्पद खाती तपास यंत्रणेच्या ताब्यात
निश्चलनीकरण कालावधीत नोटांची साठेबाजी आणि बनावट खात्यांमुळे चर्चेत आलेल्या अॅशक्सिस बँकेने काही संशयास्पद बँक खाती तात्पुरती गोठविल्याचे स्पष्ट केले आहे. बँक खात्यांबाबतच्या नियमांची पूर्तता तपासण्याकरिता काही बँक खाती तूर्त गोठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
देशातील या तिसऱ्या क्रमांकाच्या मोठय़ा खासगी बँकेच्या दिल्ली व परिसरातील बँक शाखांमध्ये निश्चलनीकरण कालावधीत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत तपास यंत्रणांमार्फत कार्यवाहीदेखील करण्यात आली आहे. बँकेच्या १०० हून अधिक बँक खात्यात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले असून पैकी अनेक बँक खाती ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बँकेच्या काही संशयास्पद खात्यांबाबतची माहिती अॅबक्सिस बँक व्यवस्थापनाने वित्तीय तपास गटाला दिल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबाबत बँकेला प्राथमिक टप्प्यात शंका असून त्याची चौकशी तपास यंत्रणा करेल, असे नमूद करण्यात आले आहे.
बँकेच्या काही शाखांना तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर रोकड व्यवहार अहवाल तयार करण्यात आला असून संशयास्पद व्यवहार अहवालदेखील संबंधितांना देण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. संबंधित बँक खात्यांबाबत ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ वगैरे नियमांची पूर्तता करण्यात आली आहे किंवा नाही हेही तपासले जात आहे, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
याआधी सक्तवसुली संचलनालयाने बँकेच्या दोन व्यवस्थापकपदावरील व्यक्तींना अटक केली होती. जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देण्यासाठी बँकेच्या या अधिकाऱ्यांना संबंधितांनी सोन्याच्या विटा दिल्याचे उघडकीस आले होते.