मिस्त्रींची टाटांविरुद्ध कंपनी लवादाकडे धाव
टाटा समूहातील विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावरील सदस्याचा राजीनामा दिलेल्या सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाची दारे ठोठावली आहेत. टाटा सन्समध्ये गैरव्यवस्थापन असल्याची तक्रार करीत आपण समूहाविरुद्ध लढा पुकारत असल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे. आपणहून पदत्यागाचा निर्णय जाहीर करणारे मिस्त्री यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत टाटाविरुद्ध संघर्षांचे पाऊल आता मागे पडणार नाही, असे म्हटले आहे.
टाटा सन्सने याबाबत आपण कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करीत असून मिस्त्री यांच्या तक्रारींचा सामना केला जाईल, असे जाहीर केले आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांना दूर करण्याचा निर्णय हा मिस्त्री यांनीच स्थापन केलेल्या संचालक मंडळाने घेतला होता; तेव्हा त्यांनी तो मान्य न करणे आश्चर्यकारक आहे, असेही टाटा सन्सने म्हटले आहे. याबाबत तक्रार करून मिस्त्री यांनी रतन टाटा यांच्याबद्दलचा वैरभावच प्रदर्शित केल्याचे समूहाने म्हटले आहे.
दरम्यान, मिस्त्री यांचे समर्थक समजले जाणारे अनलजीत सिंग यांनीही टाटा ग्लोबल बेव्हरेजेसच्या स्वतंत्र संचालकपदाचा राजीनामा दिला.