‘सेबी’ अध्यक्षपदासाठी शक्तिकांत दास मुख्य दावेदार
निश्चलनीकरणासंबंधी सरकारची बाजू नेटाने लावून धरणारे केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांच्याकडे भांडवली बाजाराची नियंत्रक ‘सेबी’ची सूत्रे सोपविली जाण्याचे संकेत आहेत. सेबीचे विद्यमान अध्यक्ष यू. के. सिन्हा यांची विस्तारित कारकीर्द पुढील वर्षी फेब्रुवारीच्या मध्याला संपुष्टात येत असून, त्यांचे उत्तराधिकारी म्हणून दास यांच्यासह अर्थमंत्रालयातील काही बडय़ा नोकरशहांची नावे पुढे आली आहेत.
सरकारने सरलेल्या सप्टेंबरपासूनच सेबीच्या प्रमुखपदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली असून, यासंबंधाने अनेक दावेदार रीतसर अर्ज दाखल करून पुढे आले आहेत. १८ फेब्रुवारी २०११ पासून सेबीची धुरा यू. के. सिन्हा सांभाळत आहेत. प्रारंभी तीन वर्षांसाठी झालेल्या त्यांच्या या नियुक्तीला मधल्या काळात दोनदा मुदतवाढ दिली गेली आहे. त्यांच्या पश्चात या जागेवर वर्णी लागू शकेल, अशी दिल्लीतील तीन वरिष्ठ नोकरशहांची नावे चर्चेत असल्याचे सूत्रांकडून समजते. दास यांच्या व्यतिरिक्त ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पी. के. पुजारी आणि अर्थमंत्रालयातील अतिरिक्त सचिव अजय त्यागी असे हे तीन दावेदार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च मूल्याच्या नोटा अवैध ठरविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, चलनकल्लोळात गेल्या दीड महिन्यात शक्तिकांत दास यांच्याकडेच सरकारचे आर्थिक प्रवक्तेपद आले आहे. तामिळनाडूच्या तुकडीतून भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालेले दास हे ‘सेबी’च्या संचालक मंडळावर सध्या कार्यरत आहेत. रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळावरही ते केंद्राचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
अन्य दावेदारांपैकी त्यागी हे आर्थिक व्यवहार विभागाबरोबरच, भांडवली बाजाराच्या नियमनावरही अर्थमंत्रालयातून देखरेख ठेवत असतात. हिमाचलमधून प्रशासकीय सेवेत दाखल झालेले त्यागी हे अल्पावधीसाठी रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत होते. तर पुजारी हे गुजरात राज्याच्या तुकडीतून भारतीय प्रशासकीय सेवेत आलेले सनदी अधिकारी आहेत. ऊर्जा मंत्रालयाव्यतिरिक्त त्यांनी कृषी आणि अर्थमंत्रालयातही कारकीर्द राहिली आहे.
तथापि, सरकारकडून कोणत्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केले जाईल हे वित्तीय नियामकांच्या नियुक्ती शोध समितीकडून केल्या जाणाऱ्या नावाच्या शिफारशीवर अवलंबून असेल. ही समितीच इच्छुक अर्जदारांमधून छाननी करून अंतिम दावेदारांच्या मुलाखतीपश्चात आपली शिफारस केंद्राला पाठवेल. गेल्या वर्षीही या समितीने सेबीच्या प्रमुखपदासाठी उमेदवारांचा शोध सुरू केला होता आणि या प्रक्रियेत ५० अर्जही दाखल झाले होते. त्यातून अंतिम मुलाखतीसाठी सात नावे निश्चित झाल्यावर केंद्राने ऐनवेळी सिन्हा यांना आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
गेल्या दीड महिन्यात शक्तिकांत दास यांच्याकडेच सरकारचे आर्थिक प्रवक्तेपद आले आहे. तामिळनाडूच्या तुकडीतून भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालेले दास हे ‘सेबी’ तसेच रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहेत.