ऑस्ट्रेलियात कोळसा खाणीसाठी 'अदानी'चा मंजूर परवाना न्यायालयाकडून रद्द

Adaniजगातील सर्वात मोठी कोळशाची खाण ऑस्ट्रेलियात सुरू करण्याच्या अदानी समूहाच्या प्रयत्नाला सुरूंग लागला. तेथील न्यायालयाने या १६.५ अब्ज डॉलर्सच्या खाण प्रकल्पाला दिलेली पर्यावरणीय मंजुरी स्थानिक लोकांनी व पर्यावरणवादी गटाकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत रद्द केली.

अदानी यांच्या कोळसा खाणीला पर्यावरण प्राधिकरणाने पर्यावरणीय मंजुरी दिली होती, ती संघराज्य न्यायालयाने रद्द केली. पर्यावरणमंत्री ग्रेग हंट यांनी याका स्किन्क व ऑरनॅमेंटल स्नेक या गॅलिली खोर्‍यातील दोन प्रजाती नष्ट होत असल्याबाबत घेण्यात आलेले आक्षेप प्रकल्पाला मंजुरी देण्याआधी विचारात घेतले नाहीत, असे 'सिडनी मॉर्निग हेराल्ड'ने म्हटले आहे.

कारमायकेल कोळसा खाणीप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना पर्यावरणवाद्यांनी हा निकाल म्हणजे 'मोठा विजय' असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने मॅके संवर्धन गटाने या वर्षी दाखल केलेल्या याचिकेवर हा निकाल दिला आहे.

स्युग हिगिंन्सन यांनी मॅके गटाचे प्रतिनिधित्व करताना सांगितले, की आता मध्य क्वीन्सलँड मधील या खाणीला मान्यता मिळणार नाही. असे असले तरी संबंधित मंत्री योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून खाणीला पुन्हा परवानगी देऊ शकतात. त्यांनी पुन्हा परवानगी देण्याचा प्रयत्न केला, तरी आमच्या अशिलांकडे अनेक पर्यावरण पुरावे आहेत, त्यामुळे अशी पुन्हा परवानगी देणे त्यांना सोपे जाणार नाही. त्यामुळे अडानी यांची कोळशाची खाण तेथे सुरू होणे जवळपास अशक्य आहे. कोळसा खाण रद्द करण्याचा निर्णय घेताना संपूर्ण परवाना प्रक्रियेचा विचार करण्याची गरज नसते.

आता मंत्र्यांना याबाबत अंतिम सल्ला देण्यास सहा ते आठ आठवडय़ांचा कालावधी लागेल. अदानी समूहाने म्हटले आहे, की तांत्रिक व कायदेशीर चुकांमुळे परवानगी रद्द झाली आहे त्यात दुरुस्ती होईल अशी आशा वाटते. खाणीला जोडणारा रेल्वे मार्ग व बंदरांचे प्रकल्प क्वीन्सलँड मध्ये पूर्ण करण्याचे आम्ही वचन दिले आहे.