जागतिक सुवर्ण परिषदेच्या शेर्‍यावर सराफ उद्योगाचा आक्षेप

gold1जगातील दुसरा मोठा सोने आयातदार देश असलेल्या भारतात विकल्या जाणार्‍या सोन्याच्या दागिन्यांपैकी जेमतेम ३० टक्के दागिनेच शुद्धतेबाबत 'प्रमाणित' असतात, या जागतिक सुवर्ण परिषदेने (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) सर्वेक्षणाअंती मांडलेल्या निष्कर्षांवर देशातील सराफ उद्योगानेच आक्षेप नोंदविला आहे. असे प्रमाणीकरण करणार्‍या 'दी इंडियन असोसिएशन ऑफ हॉलमार्किंग सेंटर्स'नेही हा दावा आधारहीन आहे असे म्ह्टले असून त्याचे खंडन केले आहे.

गेल्या आर्थिक वर्षांत देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांमधून तब्बल २.६ कोटी दागिन्यांच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्यात आले. या दागिन्यांचे सरासरी १८ ग्रॅम वजन ध्यानात घेतल्यास तौन्सिलच्या दाव्यातील फोलपणा स्पष्ट होतो, असे हॉलमार्किंग सेंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद अजमेरा यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते गेल्या आर्थिक वर्षांत सुमारे ५०० टनांहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाणन करण्यात आले, जे देशात विक्री होणार्‍या दागिन्यांच्या विक्रीच्या ५० टक्के इतके आहे.

प्रत्येक दागिन्याच्या शुद्धतेचे मूल्यांकन केल्यावर त्याला 'बीआयएस' प्रमाण चिन्ह बहाल केले जाते, यासाठी भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) १० टक्केदराने स्वामित्व शुल्क अदा केले जाते. २०१४-१५ मध्ये त्यापोटी भरण्यात आलेले ६ ते ७ कोटी रुपयेही प्रत्यक्षात झालेल्या प्रमाणीकरणाची मात्रा स्पष्ट करते, अशी अजमेरा यांनी पुस्ती जोडली.

देशभरातील जवळपास ३५० हॉलमार्किंग केंद्रांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटनेच्या मते भारतीय जवाहिर उद्योगातील निम्म्याहून अधिक आभूषणे हे शुद्धतेचे प्रमाणपत्र मिळवीत असल्याचा दावा आहे. तर वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध केलेल्या पाहणी अहवालात, भारतीय आभूषणकारांनी मानक प्रमाणपत्र मिळविल्यास, देशातून होणार्‍या दागिन्यांची निर्यात सध्याच्या ८ अब्ज डॉलरच्या तुलनेत २०२० पर्यंत पाचपटीने वाढून ४० अब्ज डॉलरवर जाऊ शकेल, असे मत मांडले होते. शिवाय, कौन्सिलने या अहवालात हॉलमार्किंग केंद्राच्या दर्जा व विश्वासार्हतेबाबतही शंका उपस्थित केली होती.

विक्री होणारी सर्व आभूषणे ही शुद्धतेचे मानक असलेल्या प्रमाणपत्राने युक्त असावीत, असे जरी मान्य केले तरी बहुतांश हॉलमार्किंग केंद्रे हे बडी शहरे व त्याभोवती एकवटलेली असल्याने, व्यावहारिकदृष्टय़ा हे शक्य होताना दिसत नाही, असेही स्पष्टीकरण अजमेरा यांनी केले. शुद्धतेचे प्रमाणपत्र असलेले सोन्याचे दागिने तारण ठेवल्यास, बँका व वित्तसंस्थांकडून त्या दागिन्यांच्या मूल्याइतके १०० टक्के कर्ज प्रदान करण्याबाबत रिझव्र्ह बँकेच्या ताजे निर्देशही प्रमाणपत्राबाबत ग्राहकांमध्ये जागरूकतेस हातभार लावणारे ठरले आहेत.