राज्य सहकारी बँक महासंघाच्या मुख्याधिकारीपदी स्वाती पांडे

MSCBAराज्यातील नागरी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या 'महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर स्वाती पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेकडे संस्थेच्या नेतृत्वपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

बँकिंग आणि प्रामुख्याने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे २५ वर्षांचा अनुभव असलेल्या स्वाती पांडे, या गेली १० वर्षे संस्थेच्या बँकिंग तंत्रज्ञान सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. सिंधुदुर्गपासून गडचिरोलीपर्यंत बँकांच्या तंत्रज्ञानविषयक गरजा व समस्यांचे निराकरणासह, सहकारी बँकांमध्ये तळागाळापर्यंत संगणकीकरण समर्थतेसाठी त्यांनी काम केले आहे. ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिटय़ूट या आंतरराष्ट्रीय संस्थेवर पॅनेल ऑडिटर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गुणवत्तेने युक्त मनुष्यबळ, उन्नत कारभार व तंत्रज्ञानाचा अवलंब या माध्यमातून सहकारी बँकिंगचे एक पाऊल पुढे नेण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून कटिबद्धता स्वाती पांडे यांनी व्यक्त केली आहे.