चीनची अर्थव्यवस्था मंदावली

china economyदेशांतर्गत वस्तूंची मागणी आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती कमी झाल्याने मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चीनमधील आयात-निर्यात अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. परिणामी, चीनमधील अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे हे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

‘रॉयटर्स‘ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, चीनच्या अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा १ टक्‍क्‍याने अधिक घसरण झाली आहे. जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमधील मागील आर्थिक वर्षाशी तुलना केल्यास निर्यातीमध्ये ८.३ टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे. तसेच आयातीमध्ये ८.१ टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. आयात ८ टक्‍क्‍यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. देशांतर्गत वस्तूंची मागणी आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमती कमी झाल्याने आयातीतही घसरण झाली आहे.

जूनच्या आकडेवारीवरून अर्थव्यवस्था स्थिर राहण्याची चिन्हे दर्शविली होती. आता मात्र जुलैची आयात-निर्यातीची आकडेवारी चिनी अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्‍यता आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, आयातीत झालेली घट देशांतर्गत अर्थव्यवस्था मंदावल्याचे सूचित करते आहे. दरम्यान, अनियमित जागतिक मागणी आणि मजबूत झालेल्या चिनी युआनमुळे निर्यातीला बळ मिळण्याची शक्‍यता आहे.