सी.एम.आय.ए. च्या शिष्टमंडळाची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांबरोबर चर्चा संपन्न

cmiaचेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅंड अ‍ॅग्रीकल्चर (सी.एम.आय.ए.) च्या शिष्टमंडळाने मा. प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री यांची भेट घेतली व त्यांच्याबरोबर औरंगाबादस्थित उद्योगांच्या विविध समस्या याविषयी चर्चा केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस, सी.एम.आय.ए.चे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी या विशेष बैठकीचे आयोजन करण्या मागचा उद्देश विशद केला. या बैठकीदरम्यान मंत्री महोदयांनी उपस्थित उद्योजक व उद्योग प्रतिनिधी यांचे प्रश्न समजावून घेतले. या बैठकी दरम्यान प्रकाश जावडेकर यांनी केंद्र शासनाने पर्यावरण संदर्भात राबविण्यात येणा-या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी उदयोगांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे व पर्यावरण प्रदुषीत होवू नये म्हणून वेळोवेळी शासनाने जारी केलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले. या बैठकीत मा. हरित लवादाने जाहीर केलेले आदेश व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची त्या अनुषंगाने केलेली कार्यवाही याविषयी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी बोलताना सी.एम.आय.ए.चे मानद सचिव प्रसाद कोकीळ यांनी सी.एम.आय.ए.च्या माध्यमातून या संदर्भात हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांविषयी महिती दिली. यामध्ये प्रामुख्याने सांडपाण्याचा पुनर्वापर तसेच घनकचरा व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. तसेच विभागातील सर्व औदयोगिक संघटना एकत्र येऊन मराठवाडा एनव्हायर्नमेंटल केअर क्लस्टर (एम.ई.सी.सी.) नावाची ’नॉन प्रॉफीट’ संस्था स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हया संस्थांचाही सहभाग आहे व तो वाढविण्याची त्यांनी तयारी दर्शविलेली आहे. एम.ई.सी.सी. मार्फत पर्यावरणास हानीकारक असलेले घनकचरा पदार्थ व्यवस्थापनाचा विषय प्रामुख्याने हाताळण्यात येईल तसेच संपूर्ण म.औ.वि.म. परिसरात स्वच्छ व हरित प्रकल्प राबविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

त्यानंतर मा.मंत्री महोदयांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे/शंकांचे निरसन केले.या चर्चेत सी.एम.आय.ए.तर्फे अध्यक्ष अशिष गर्दे, मानद सचिव प्रसाद कोकीळ, उपध्यक्ष, गुरप्रीत बग्गा, माजी अध्यक्ष एन.के.गुप्ता, गौतम नंदावत, सी.पी.त्रिपाठी उमेष दाशरथी, मिलिंद कंक,कार्यकारी समितीचे सदस्य जी.के.संगनेरिआ, अक्षय राठी, रितेश मिश्रा, सौरभ भोगले, रमण अजगांवकर, र.ह.मार्लापल्ले,विनोद नांदापुरकर, मैथिली तांबोळकर, उदयोजक विवेक देशपांडे, अनिल भालेराव, आबासाहेब देशपांडे, रोहित देशपांडे, मुकुंद बडवे, लक्ष्मिकांत मिनियार, व्ही.के. श्रीवास्तव, रवि वैद्य यांनी भाग घेतला.