'सफल'चे ३,००० कोटींच्या कर्जवितरणाचे लक्ष्य

logo

जलसिंचन क्षेत्रासाठी खासगी क्षेत्रातील पहिली बिगर बँकिंग वित्तसंस्था असलेल्या 'सफल'ने येत्या पाच वर्षांत ३,००० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे लक्ष्य राखले आहे. कंपनी चालू आर्थिक वर्षांत कमी पाऊस होत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यावर कर्ज वितरणासाठी अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

खास विदर्भासाठी राबविलेल्या विदर्भ प्रोत्साहन जलसिंचन विकास कार्यक्रमांतर्गत 'सफल'ने सव्वा वर्षांत ५.२५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. विदर्भ व मराठवाड्यावर अधिक भर देणार्‍या सफलने चालू आर्थिक वर्षांत या भागात ७४ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे लक्ष्य राखले आहे. पैकी ३० कोटी विदर्भ, तर ४४ कोटी रुपये हे मराठवाड्यातील शेतकर्‍यांना वितरित केले जाणार आहेत.

कंपनीच्या प्रवासाबाबत सफल (सस्टेनेबल अ‍ॅग्रो-कमर्शियल फायनान्स)चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सोनमळे यांनी सांगितले की, कंपनीच्या अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण एक टक्क्याखाली आहे. सव्वादोन वर्षांच्या कालावधीत कंपनीने १९६ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून गेल्या आर्थिक वर्षांत १०० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी नोंदविली गेली असताना ९५ कोटी रुपयांवरील कर्ज वितरित झाले आहे.

महाराष्ट्रात २५ शाखा असलेली 'सफल' ही 'सॅटेलाइट' कार्यालयाच्या माध्यमातून आपले अस्तित्व दक्षिणेत विस्तारणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ राज्यांमध्येही आणखी 'सॅटेलाइट' कार्यालये सुरू करण्यात येतील, असेही सोनमळे यांनी सांगितले. येत्या पाच वर्षांत 'सफल'च्या २५० हून अधिक शाखा होतील, असेही ते म्हणाले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division