annapurna parivar

सूक्ष्म उद्योगांचा आधारस्तंभ – 'अन्नपूर्णा परिवार'

Medha Taiकुटुंब चालवण्यासाठी लहानसहान उद्योग करणार्‍या, कष्टकरी महिलांना अल्प रकमेची कर्जे देण्याबरोबरच त्यांच्या रोजच्या जगण्यातील समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणारी संस्था म्हणजे ’अन्नपूर्णा परिवार’. डॉ.मेधा पुरव सामंत यांनी १९९३ मध्ये स्थापन केलेल्या या रोपट्याचे आता एका वटवृक्षात रुपांतर झाले आहे. पुण्यातील ६०० झोपडपट्ट्यांत तर मुंबईतील ५०० झोपडपट्ट्यांमध्ये कार्यरत असणार्‍या ’अन्नपूर्णा परिवारा’चे आज तब्बल ५५,००० कर्जदार आहेत व एकूण ८०,००० सभासद आहेत.  ही संस्था उभारण्यामागील प्रेरणा काय होती, संस्थेचे कार्य नेमके कसे चालते व इतर उपक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी 'अन्नपूर्णा’च्या सर्वेसर्वा डॉ. मेधा पुरव सामंत यांच्याशी चित्रा वाघ यांनी केलेली बातचित.

राजकारण आणि समाजकारण जिथे एकत्र नांदत होतं अशा घरात डॉ. मेधा पुरव सामंत वाढल्या. गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रेमाताई पुरव आणि प्रसिद्ध कामगार नेते कॉम्रेड दादा पुरव यांची ही कन्या. साहजिकच कष्टकर्‍यांचं जगणं आणि त्यांच्या नेमक्या समस्यांची याची ओळख त्यांना लहानपणापासूनच झाली.  

प्रेमाताई पुरव यांनी "अन्नपूर्णा महिला मंडळ'या नावाने मुंबईत १९७५ मध्ये स्थापन केलेल्या संस्थेतर्फे खाणावळी चालवणार्‍या महिलांना बॅंकांकडून कर्जे उपलब्ध करून देऊन आपल्या कार्याची सुरूवात केली.

पुण्यात बॅंक ऑफ इंडियात नोकरी करत असताना इतर अनेक नोकरदार स्त्रियांप्रमाणे भाजीवाल्या महिलांशी मेधाताईंचा संपर्क येत असे. त्या गरीब महिलांच्या कष्टांचा, तुटपुंज्या मिळकतीचा, कर्जबाजारी परिस्थितीचा विचार त्यांचा मनात येत असे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्या सोडवण्यासाठी काहीतरी ठोस करावे, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले.
१९९३ जुलैचा तो काळ. प्रायोगिक तत्वावर पुण्यातील एसएनडीटी कॉलेज परिसरातील नऊ भाजीविक्रेत्या महिलांना प्रत्येकी १००० रुपयांचे कर्ज त्यांनी स्वत: देऊ केलं. दररोज २५ रुपये याप्रमाणे खासगी सावकारासारखी वसुलीही केली. दोन महिन्यांतच सर्व महिलांचे कर्ज वसूल होऊन त्यांची बचतही झाल्याचे मेधाताईंनी त्या महिलांना दाखवून दिले. खासगी सावकाराच्या कर्जचक्रात अडकणार्‍या त्या गरीब महिलांसाठी तो खरोखरच एक सुखद धक्का होता. अल्प रकमेचे अल्पकालीन कर्ज उभे करून दिल्यास अनेक गोरगरिबांना मदत होऊ शकते, हे या प्रयोगातून मेधाताईंना जाणवले. मात्र अशा प्रकारचे कर्ज सहज उपलब्ध करून देणारी कोणतीही यंत्रणा नव्हती, हेही त्यांच्या लक्षात आले. मग ही यंत्रणा स्वत:च निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे मेधाताईंनी बॅंक ऑफ इंडियातील उच्च पदाच्या नोकरीला रामराम ठोकला आणि "अन्नपूर्णा परिवारा'ची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. आपल्या आईच्या, प्रेमाताईंच्या विचाराला नवीन संकल्पांची जोड देऊन कामाचे क्षितिज पुढे विस्तारले.
शहरी झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना, मुख्यत: गरीब स्त्रियांना लहान रकमेची कर्जे देऊन त्यांना स्वत:चे व कुटुंबाचे सक्षमीकरण करण्यास मदत करणे हे यामागील मुख्य ध्येय होते.annapurna parivar

आज "अन्नपूर्णा महिला क्रेडिट को ऑॅप. सोसायटी' या संस्थेचे काम पुण्यातील ६०० झोपडपट्ट्यांत तर मुंबईतील ५०० झोपडपट्ट्यांमध्ये चालू आहे. या संस्थेचे ५५,००० कर्जदार आहेत व एकूण ८०,००० सभासद आहेत. कर्जदारांमध्ये महिलांचे प्रमाण ९० टक्के तर पुरूषांचे प्रमाण १० टक्के आहे. कर्ज देण्यासंबंधी रिझर्व्ह बॅंकेच्या काही अटींचे पालन करावे लागते का या प्रश्नावर मेधाताई म्हणाल्या,
’अन्नपूर्णा Credit Society ही को. ऑप. कायदयाअंतर्गत येते. त्यामुळे प्रत्यक्षपणे रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण नसते. परंतु अन्नपूर्णा गरीब व्यवसायिकांना कर्ज देण्यासाठी विविध बॅंकांकडून कर्ज घेते. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेचे अप्रत्यक्ष नियंत्रण असते. त्यानुसार लघुवित्त याखाली जास्तीत जास्त किती रक्कम दयावी, व्याजदर किती टक्क्यापर्यंत आकारता येईल इ. नियम पाळावे लागतात.  दरवर्षी रेटिंग करून घ्यावे लागते. 'कोड ऑफ कंडक्ट' ऑडिट व Financial Audit हे सुद्धा करावेच लागते.’
’अन्नपूर्णा परिवार'चे काम फक्त मायक्रो फायनान्सपुरतेच मर्यादित राहिले नाही. या कष्टकरी महिलांच्या मुलांना सांभाळण्याच्या प्रश्नापासून ते आकस्मिक आजारपणं, घरातल्या मुख्य व्यक्तीचे निधन अशा अनेक संकटप्रसंगांमध्ये गरीब कुटुंबांना मदतीची गरज भासते. मेधाताईंच्या हे लक्षात आले की केवळ अर्थसहाय्य देऊन या महिलांची गरज भागणार नाही. त्यांना इतरही अनेक आघाडयांवर मदत केली तरच त्या धीराने आपल्या संसाराचा गाडा पुढे ओढू शकतील.
त्याविषयी मेधाताई सांगतात, ’अन्नपूर्णा परिवाराच्या विविध योजना गेल्या २३ वर्षांत या कष्टकरी कुटुंबांच्या गरजेनुसार विकसित झाल्या आहेत. आज अन्नपूर्णा परिवाराअंतर्गत पाच संस्था काम करत आहेत. या सर्व कामांची सुरवात होते ती किरकोळ कर्ज देण्यापासून. ’अन्नपूर्णा'च्या लोन आणि सेव्हिंग ऑॅफिसर झोपडवस्ती पातळीवर जाऊन किरकोळ व्यवसाय करणार्‍या महिलांना आपल्या योजनांची माहिती देतात. वस्तीमधील एकाच स्वरूपाचा उद्योग करणार्‍या पाच महिलांचा संयुक्त गट स्थापन केला जातो. त्यांनी परस्परांची घेतलेली हमी, हेच आमच्यासाठी तारण असते.'
अन्नपूर्णा परिवारातर्फे चालवण्यात येणारी एक योजना म्हणजे ’आरोग्यनिधी'  अर्थात आरोग्य¹विमा. याखेरीज, कर्जदाराचा मृत्यु झाल्यास  ’जीवन सहयोग निधी' तर्फे त्याची कर्जाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात येते व शिवाय काही आर्थिक मदत त्या कुटुंबाला दिली जाते.
आरोग्यविम्यातून आजारपणात सल्ला तपासणी विनामूल्य दिली जाते. हॉस्पिटल्स व तपासणी केंद्राशी करार करून कमी दरात सेवा दिल्या जातात व आर्थिक मदत दिली जाते. आज या विम्याचे १६५००० सभासद आहेत. याखेरीज भारत सरकारची "स्वावलंबन पेन्शन योजना' अन्नपूर्णा परिवारातर्फे २०१२ राबवली जाते ज्यात १३००० सभासद आहेत व दरमहा सभासद संख्या वाढतच आहे.
’वात्सल्यपूर्णा सेवा को ऑॅपरेटीव सोसायटी' या संस्थेच्या माध्यमातून झोपडपट्टयांमधील सभासद महिलांच्या मुलांसाठी २१ पाळणाघरे चालवली जातात. ’विद्यापूर्णा' या प्रकल्पाद्वारे एकाकी कर्जदार महिलांच्या मुलांना वर्षाला २५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच नवी मुंबईतील वाशी येथे काम करणार्‍या महिलांसाठी संस्थेच्या वतीने वसतिगृह चालवले जाते.
’केवळ कर्ज देणे व कर्जाची वसुली करणे इतकेच ’अन्नपूर्णा'च्या कार्याचे उद्दिष्ट राहिलेले नाही तर ज्यांना आपण कर्जे देतो त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी हातभार लावणे आणि त्याविषयीच्या सर्व निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करणे हे आम्हाला महत्त्वाचे वाटते' असे मत मेधाताईंनी व्यक्त केले.
कर्ज देताना कुठले निकष पाहिले जातात आणि परतफेडीचा अनुभव कसा आहे या प्रश्नावर त्या म्हणाल्या,
कर्ज देताना फक्त गरीब व गरजू महिलांनाच दिले जाते. त्या स्वत: काही तरी व्यवसाय / कामधंदा करत आहेत ना हे पाहिले जाते. रेशनकार्ड, आधारकार्ड यासारखी किमान कागदपत्रे घेऊन केवळ ५ महिलांचा गट एकमेकींची जबाबदारी घ्यायला तयार आहे ना. एवढेच पाहून प्रत्येकीला रू.१०,०००/- चे पहिले कर्ज दिले जाते.
कर्जफेडीचा अनुभव चांगलाच आहे.  महिलांना कर्ज देताना अन्नपूर्णा संपूर्ण पारदर्शकता ठेवते. शिवाय कर्जाव्यतिरीक्त खूप सुविधा देते.  याशिवाय त्यांच्या वस्तीत जाऊन एल.एस.ओ. रिकव्हरी करते. या सर्व गोष्टींमुळे महिला १००% कर्जफेड करतात. पहिल्या कर्जाची नीट परतफेड केली तर पुढिल कर्ज वाढीव रकमेचे अन्नपूर्णाकडून दिले जाते. त्यामुळे महिला  रू.१०,०००/- च्या कर्जापासून सुरूवात करून टप्प्या टप्प्याने वाढीव कर्ज घेत रू.१,५०,०००/- पर्यंत रक्कम घेऊ शकतात.
एकटीच्या जबाबदारीवर सुरू केलेल्या अन्नपूर्णा परिवारामध्ये मेधाताईंबरोबर आज ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. वस्ती पातळीवर काम करण्यासाठी फिल्ड स्टाफ आहेत.  हया १०वी ते १२वी पर्यंत शिकलेल्या अल्पशिक्षित महिला आहेत. त्यांना कामावर घेण्यापूर्वी ३ दिवसांचे प्रशिक्षण व त्यानंतर परीक्षा घेतली जाते व कामावर घेतल्यानंतरही दरमहा १ पूर्ण दिवस प्रशिक्षण दिले जाते. अन्नपूर्णाच्या हेड ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर काम करणार्‍या, अकाउंटस डिपार्टमेंट, ऍडमिन डिपार्टमेंट अशा मधील महिला या साधारणपणे ग्रॅज्युएट आहेत. त्यांना सुद्धा On the job’  प्रशिक्षण सुरूवातीला व पुढे दर २ महिन्यापासून एकदा दिले जाते.  अन्नपूर्णात मॅनेजर्स पदावर काम करणार्‍या महिला व पुरूष कर्मचारी हे साधारणपण Post Graduate / सोशल वर्क मधील MSW असे आहेत. त्यांनाही दरमहा ट्रेनिंग दिले जाते.
दरवर्षी अन्नपूर्णा परिवाराच्या पुणे आणि मुंबई येथे होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेला १५ ते २० हजारांच्या संख्येने कर्जदार महिला उपस्थित असतात. महिलांसमोर कामाचा आदर्श निर्माण व्हावा म्हणून या सभेमध्ये दरवर्षी दोन महिला उद्योजिकेला पुरस्कार देऊन गौरविले जाते. शिवाय "अन्नपूर्णा'च्या कर्जदार महिलांचाही गौरव केला जातो.
जिद्द चिकाटी व अंगीभूत कौशल्य याच्या आधाराने महिलांना प्रगती साधता येतेच येते पण व्यवसायात उतरताना आपल्यातील कौशल्य काय आहे व त्याचा वापर करून काय सेवा/ उत्पादन आपण विक्रीस ठेवू शकतो याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे यावर मेधाताईंचा ठाम विश्वास आहे. अशा सर्व कष्टकरी उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी आणि त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी मेधाताईंबरोबरच अवघा 'अन्नपूर्णा परिवार' तत्पर आहे. त्यांच्या पुढील सर्व उपक्रमांना मन:पूर्वक शुभेच्छा!

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division