अॅग्रोगॅस – उर्जानिर्मितीचा एक अभिनव स्त्रोत

image001

भारतासारख्या कृषीप्रधान देशात ऊर्जानिर्मितीचा अभिनव स्त्रोत म्हणून ‘अॅग्रोगॅस’ ही नवी संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. कृषीक्षेत्रातून निर्माण होणाऱ्या टाकाऊ मालापासून हा नैसर्गिक वायू बनविण्याचे प्रकल्प उभारून देण्याचे काम पुणेस्थित प्रायमूव्ह इंजिनियरिंग प्रा.लि. यांच्यातर्फे करण्यात येते. इंधनटंचाईवर एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून समोर येणाऱ्या ‘अॅग्रोगॅस’निर्मितीसंबंधी आपण जाणून घेणार आहोत प्रायमूव्ह इंजिनियरिंगचे व्हाइस प्रेसिडेंट (बिझिनेस डेव्हलपमेंट) अतुल आकोलकर यांच्याकडून...

primove 1१. आपल्या व्यवसायाचे स्वरूप काय आहे?

- ‘अॅग्रोगॅस’ हा शेतीमध्ये निर्माण झालेले कृषी अवशेषांपासून (काडीकचरा) ऊर्जानिर्मितीचा, प्रायमूव्ह इंजिनियरिंग प्रा. लि. ने लावलेला एक नवीन शोध आहे. शेतीचे पीक घेतल्यानंतर, शेतात उरलेले कृषी अवशेष (काडीकचरा) जाळून टाकण्याऐवजी त्यातून ठिकठिकाणी बायो सीएनजी बनविण्याचे प्रकल्प उभे करून देणे, असे या व्यवसायाचे स्वरूप आहे.

शेतीमधील कृषी अवशेष हा काही प्रमाणात गुरांना खाद्य म्हणून उपयोगात आणला जातो, परंतु साधारणतः ८५% कृषी अवशेष जाळून टाकले जातात. हा कचरा जाळून टाकल्यावर मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते आणि त्यातून स्थानिक नागरिकांना श्वसनाचे विकार होऊन सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. ‘अॅग्रोगॅस’ बायो सीएनजी प्रकल्प हे या प्रश्नाचे उत्तर आहे !

संपूर्ण देशातील कृषी अवशेष, जर ‘अॅग्रोगॅस’ बायो सीएनजी बनविण्यासाठी उपयोगात आणला गेला तर आपल्या देशाची खनिज तेल आयात ५०% पेक्षा कमी होऊन, आपल्या देशाचे कित्येक लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचविण्यात आपण यशस्वी होऊ.

२. या प्रकारच्या संकल्पनेला कृषीउद्योगाकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित आहे?

- शेतकऱ्यांनी आपापल्या भागात सहकारी संघ किंवा बचत गट स्थापन करून, शेतीमध्ये निर्माण झालेले कृषी अवशेष वापरून इंधन विटा (ब्रिकेट) बनविण्याचे छोटे प्रकल्प उभे करावेत. या इंधन विटा जवळच्या ‘अॅग्रोगॅस’ बायो सीएनजी प्रकल्पावर पाठविल्या जाव्यात. या इंधन विटांचा वापर करून त्यातून बायो सीएनजी तयार करून वाहनांमध्ये भरून देण्यासाठीचे बायो सीएनजी पंप उभे करावेत.

याद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे एक नवीन साधन निर्माण होईल, तसेच स्थानिकांमधील इच्छुक महिला आणि पुरुषांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

p1३. पुणे येथे सुरु करण्यात आलेल्या स्टार्ट अपचा अनुभव कसा होता?

- पुण्यापासून जवळ असलेल्या पिरंगुट येथे ‘प्रायमूव्ह’ कंपनीने भारतातील पहिला बायो सीएनजी पंप उभारला आहे (Proof Of Concept). या प्रकल्पामध्ये कृषी अवशेष वापरून तयार केलेल्या इंधन विटांपासून(ब्रिकेट) बायो सीएनजी तयार केला जातो, ज्याचे नाव ‘अॅग्रोगॅस’ असे आहे. हा तयार झालेला बायो सीएनजी तीन/चार चाकी वाहनांमध्ये भरून दिला जातो.

प्रत्येक प्रायोगिक प्रकल्प तयार करताना खूप अडचणी येतात. असे प्रकल्प हाती घेणे हे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांसमोर मोठे आव्हान असते, आणि अशा मोठ्या आव्हांनांवर मात करणे हे खूपच आनंददायी असते.

यावर्षी ऑगस्ट महिन्यात सदर प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व नौवहन मंत्री, मा. नितीन गडकरी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मा. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि आमच्या सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी गेल्या ८-१० वर्षांपासून केलेल्या परिश्रमांचे सार्थक झाले.

primove 2४. राज्याच्या इंधन समस्येवर अशा प्रकारचा पर्याय कितपत उपयोगी ठरेल असा आपला अंदाज आहे?

- वर उल्लेख केल्याप्रमाणे जर संपूर्ण देशात ५००० ते १०००० ‘अॅग्रोगॅस’ बायो सीएनजी प्रकल्प उभारले गेले तर आपल्या देशाची खनिज तेल आयात ५०%ने कमी होईल. यासाठी देशातील उपलब्ध सर्व कृषी अवशेष वापरण्यात यावा. आपल्या देशाला जर इंधन तेल आयात संपूर्णपणे आटोक्यात आणायची असेल तर इंधन शेतीचा मार्ग निवडावा लागेल. शेतकऱ्यांनी जर हत्ती गवतासारखी पिके, जी अत्यंत कमी देखभाल खर्चात घेता येतात आणि एका वर्षात तीनवेळा उत्पन्न देतात, अशा पर्यायी पिकांची लागवड केली तर निश्चितच आपण उर्जेच्या बाबतीत १००% स्वयंपूर्ण होऊ शकतो.

५. शेतापासून लांब अंतरावर बायो सीएनजी प्लांट बसविण्यासाठी काय केले जाते?

- ‘अॅग्रोगॅस’ बायो सीएनजी प्रकल्प हे लांब अंतरावर असले तरी चालू शकते. कृषी अवशेष गोळा करून त्यापासून स्थानिकरित्या बनविलेल्या इंधन विटा फार कमी खर्चात प्रकल्पापर्यंत पोचविल्या जाऊ शकतात. मात्र या इंधन विटांपासून बनविलेला बायो सीएनजी हा प्रकल्पापासून जास्तीत जास्त ५-१० किमी अंतरावर असलेल्या पंपामधून वितरीत करणे श्रेयस्कर ठरते. बायो सीएनजीच्या भरणा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे सिलिंडर (Cascade) खूप वजनदार असल्याने त्याचा वाहतूक खर्च आटोक्यात ठेवणे आवश्यक ठरते.

promove 3६. या क्षेत्रातील व्यवसाय संधींविषयी काय सांगाल?

- पेट्रोल, डीझेल, एल.पी.जी. अशा आयात केलेल्या खनिज इंधनावर विसंबून न राहता आपण उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो तर देशात सर्वांसाठी अनेक संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांना त्यांना निरुपयोगी ठरणाऱ्या कृषी अवशेषांतून उत्पन्न मिळेल. या कृषी अवशेषांपासून इंधनवीट बनविण्याच्या प्रकल्पांमध्ये अनेक जणांना रोजगार मिळेल. इंधन विटेपासून बायो सीएनजी बनविण्याचे प्रकल्प आणि त्याचे वितरण करणाऱ्या पंपावर अनेक जणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. संबंधित गुंतवणूकदारांना, त्यांनी ‘अॅग्रोगॅस’ बायो सीएनजी प्रकल्पामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम प्राप्ती होईल आणि त्यांनी केलेल्या गुंतवणूकीवर त्यांना सुमारे ३ ते ४ वर्षात संपूर्ण परतावा मिळेल. देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या वाहनांमध्ये भरण्यासाठी स्वदेशी आणि स्वस्त इंधनाचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच स्वदेशी इंधनाचा वापर वाढल्याने आपला देश उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division