बाघ बहादर ते ओला-उबर
भाग २
डॉ. नरेंद्र जोशी
ओला उबरची स्पर्धा ही आता लढाई झाली आहे. ओलाकडे २५,००० वाहने आहेत आणि १०० हून अधिक शहरात ते कार्यरत आहेत. त्यांनी दरवर्षी १,५०० वाहने वाढवायचे ठरवले आहे. २०१० मध्ये ओला, २०११ मध्ये Taxi for Sure, २०१३ मध्ये उबर (भारतात) आले. मेरू यापूर्वीच होते. Taxi for Sure ला ओलाने विकत घेतले व आपला मार्केट शेअर ६०% वरून ८०% केला. (२०११-१४) Tiber Global व Matrix Partners नी त्यांना आर्थिक सहाय्य केले. ओलाने २०११ मध्येच मोबाईल अॅप आणले. ते करण्यासाठी Taxi for sure व मेरूसाठी २०१३ उजाडावे लागले. मेरुच्या मते वाहनांची संख्या हा मार्केट शेअरचा निकष असू शकत नाही. उत्पन्न हा निकष ठेवला तर २०-२५% चा दावा मेरुने केला आहे. उबरनेही वरील मार्केटशेअरचे आकडे मान्य केलेले नाही. उबर १८ शहरात आहे पण ’मेट्रोमध्ये आम्ही ओला ला तोडीस तोड आहो” असे ते म्हणतात. उबर पूर्णपणे app based, cashless पहिल्यापासून आहे. फक्त भारतासाठी त्यांनी Paytm चा इ. option ठेवला. उबर Go हे तुलनेने स्वस्त पर्याय, पण फक्त भारतासाठी! इतरत्र उबर X (Mid Sized) & उबर BLACK (premium price) हेच पर्याय आहेत. उबरचा या मॉडेलने जगभर Gig Economy आणली. स्वतंत्रणे कॉंट्रॅक्ट पद्धतीने रोजगार उपलब्ध होऊ लागले. कार आणि वाहन चालवण्याचा परवाना असलेला कोणीही उबरसाठी काम करू शकतो अशी व्यवस्था आणली (US मध्ये). त्यामुळे गाडी जास्तीतजास्त वापरात राहते. व्यवसाय अनेकपटीने कालीपिलीच्या पुढे जातो. आज उबर ५९ देशात ३२९ शहरात चालू आहे, म्हणजे धावते आहे. ही सृजने खूप तोटा सहन करत चालू आहेत.
१३-१४ मध्ये ओलाचा निव्वळ तोटा ३४.२२ करोड, १२-१३ मध्ये तो २२.८ करोड होता. उबरच्या बाबतीत हा आकडा ४७0 मिलियन डॉलर आहे. ही नोंद आहे पण तो जुना आकडा असावा. उबरसारखे मॉडेल असणारे अनेक इतर आहेत. Luft in US, Side car (Courier + passanger), Grab टॅक्सी, Hey टॅक्सी, Didi Kuaridi (China). Hey टॅक्सी ने तर दुचाकीचाही पर्याय ठेवला आहे. ओलाला सपोर्ट करणारी Soft Bank Grp Corp जपानची आहे. उबरने ओलावर ७.५ मिलियन डॉलर नुकसानीची फिर्याद दाखल केली आहे. ओलाने ९४,००० बनावट ग्राहक नोंदवले आणि त्यातून ४,०५,००० बनावट बुकिंग केली असा आरोप आहे. उबरच्या मते त्यांनी हेही शोधले की हे उद्योग ओलाच्या कर्मचाऱ्यांमार्फतही केले गेले. ओलाच्या मते हे आरोप निराधार आहेत. उबरविरुद्ध ओलाने केलेल्या केसचा प्रतिशोध म्हणून हे होत आहे. उलट clean fuel car वापरण्याचे कोर्टाचे आदेश मानत नाही म्हणून ओलाने उबरवर न्यू दिल्ली कोर्टात केस केली आहे.
एकमेकांवरच्या या आरोप प्रत्यारोपामागे खरे आहेत ते मार्केट मोनोपॉलीसाठीचे प्रयत्न, किंमत कमी करण्याची व ड्रायव्हरना अधिकाधिक उत्तम सुविधा देण्याची चढाओढ. दरम्यान टॅक्सी युनियनचे सर्वेसर्वा अशांतच आहेत. दोन मोठ्या रेषा अधिक मोठं होण्याचे प्रयत्न करत असताना बिरबलाच्या गोष्टीतली ही कालीपिली छोटी रेष रडीचा डाव खेळण्यात गुंग आहे. ‘गेल्या दोन दशकात कालीपिली ६०,००० वरून ४५,००० वर आल्या, सरकारने आम्हाला कधी पाठिंबा दिला नाही, उबरच्या एका ड्रायव्हरने एका मुलीवर दिल्लीत बलात्कार केला व GPS ऑफ केला तर भाडे बदलू शकते’ अशा एक ना दोन अनेक उणीवा ते सांगत असतात. अनेकांचा रोजगार या जुन्या टॅक्सीवर अवलंबून आहे. त्यांच्या संसारांना ओला-उबर उध्वस्त करत आहेत असेही म्हटले जात आहे. यातल्या बऱ्याच आरोपात तथ्य आहेच.
पण असे नेहमीच होते. अधिक आकर्षक योजना, नवे प्रगत तंत्रज्ञान व भन्नाट सृजन/आविष्कार यांच्या झंझावातात जुन्यांना नेहमीच ससेहोलपट सहन करावी लागते. व्यापारी व राज्यकर्ते नेहमीच अधिक सोयीच्या, फायद्याच्या गोष्टींना झुकते, माप देतात. जनता जुनी नाती, सोयी फार लवकर विसरून नव्याकडे धाव घेते. मात्र याला कालानुरूप स्वतःत बदल घडविणे इतकेच उत्तर आहे. वाघाशी झुंज करणार्याध वेड्या बाघ बहादाराला जीव गमवावा लागतो. मोटारीशी शर्यत करणारा 'दो बिघा जमीन' मधला शेतकरी सायकल रिक्षा ऊर फाटेस्तोवर ओढतो- त्यातच स्वतःचा बळी देतो. आज टॅक्सीचालक आपण स्वत: प्रवाहाबाहेर गेलेले आहोत हे जाणवून जर अगतिक होत असेल तर काल त्यांनीही सायकल रिक्षा ओढणाऱ्या त्या असहाय्य माणसाचा बळी घेतला होता हे खरे नाही का? पण जुन्या तंत्राच्या मागासलेपणात बळी जाणारे आणि नवीन तंत्राच्या पुढारलेपणाचा फायदा उचलणारे समान बुद्धीविकास व समान उपयोग संधी या दोन्हीच्या अभावात जगणारी सामान्य माणसेच आहेत. आविष्कार करणारे, तल्लख तर अपवादात्मक आहेत मग त्याचा दोष कोणाला द्यायचा व श्रेय कोणाला!!
असो. तंत्रज्ञानाची प्रगती एकरेषीय नाही तर ex ponential, उधाणवेगी आहे. त्यात काळाची पावले ओळखून तसे सतत बदल घडवणारे आविष्कार करणारे तरतात, बाजी मारतात. फक्त हे करताना मानवी जीवन, मूल्ये व भावनांचा कमीतकमी ऱ्हास, अपव्यय वा दुरुपयोग व्हावा ही अपेक्षा ठेवता येईल. मागे एकदा ‘कानो’चे मॉडेल विस्तृतपणे सांगितले होते. सततच्या सृजनशील आविष्कारांनी यात ग्राहकांचा संतोष साध्य करता येतो. बिरबलाची मोठी रेष म्हणजे कानोची ‘curve of delight’ ची रेष आहे हा या गोष्टीचा मथितार्थ!!