'मोठे उद्योग नाशिकला येण्यासाठी कनेक्टीव्हीटी उत्तम करणे गरजेचे!'
– संजीव नारंग, अध्यक्ष - निमा.

Sunjeev Narang

नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतेच संजीव नारंग यांची निवड झाली. नाशिकच्या औद्योगिक स्थितीबद्दल आणि निमाच्या आगामी योजनांबद्दल अविनाश पाठक यांनी त्यांच्याशी केलेली बातचित.

नाशिकच्या औद्योगिक विकासाबद्दल आपले काय मत आहे?

नाशिकचा औद्योगिक विकास गेल्या काही वर्षात म्हणावा तितका समाधानकारक झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे नाशिकला कनेक्टिव्हीटी अधिक चांगली होणे महत्त्वाचे आहे. मोठे उद्योग नाशिकला आणण्यासाठी कनेक्टीव्हीटी महत्त्वाची असून त्यासाठी निमातर्फे राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. नाशिकला ओझरला विमानसेवा आहे पण ती नियमित व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सर्व औद्योगिक संघटनांना एकत्र आणून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. नाशिक पुणे रेल्वे सेवा त्वरित सुरू व्हावी यासाठीदेखील प्रयत्न चालू आहेत.

कामगार कायद्यात झालेले बदल उद्योग विकासासाठी कसे पूरक आहेत ?

कामगार कायद्यात शासनाने केलेल्या बदलांचा अभ्यास सुरू आहे. मात्र केवळ उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीनेच कामगार कायद्यात बदल झालेले नाहीत. उद्योजक व कामगार या दोघांच्याही हिताचे बदल कामगार कायद्यात झालेले आहेत. त्यामुळे युनियनमुळे होणाऱ्या अडचणी निश्चितच बंद होणार आहेत. पर्यायाने कामगार व उद्योजक दोघांचाही फायदा होणार आहे. बदललेला कामगार कायदा त्वरित अंमलात आणला जायला हवा जेणेकरून उद्योगांच्या विकासाला गती मिळेल.

लोकल बॉडी टॅक्स रद्द झाला आहे. मात्र त्यात मोठ्या उद्योगांनाही सूट मिळणे आवश्यक आहे त्याबाबत निमाची भूमिका काय आहे?

लोकल बॉडी टॅक्स रद्द झाला आहे हे चांगलेच आहे. त्याचा फायदा व्यापारी व छोट्या उद्योगांना होत आहे. मोठ्या उद्योगांनाही त्याचा फायदा मिळणे अपेक्षित होते. तसे झाले नाही मात्र त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून सकारात्मक चर्चा सुरू आहे. मोठया उद्योगांचाही लोकल बॉडी टॅक्स रद्द झाला तर नाशिकच्या औद्योगिक विकासाला चांगली गती मिळेल. नवीन मोठे उद्योग इथे येण्यास मदत होईल.

फॅक्टरी अॅक्टमध्ये कुठले बदल होत आहेत?

फॅक्टरी अॅक्टचे असलेल्या नियमांमध्ये बदल होणे गरजेचे झाले असल्याने शासनाकडून त्यामध्ये मोठा बदल होत असल्याचे संकेत निश्चितच आहेत. शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे दिसत असून त्यादृष्टीने उद्योग विकासासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. निमातर्फेही यासंबंधी पाठपुरावा सुरू आहे.

नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी व उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांचे कामकाज नियमित होत नाही खरे आहे का?

होय. नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी व उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या सुकरता परिषद, जिल्हा उद्योग समिती, शांतता समिती इत्यादी समित्या आहेत. मात्र या समित्यांवर विविध शासकीय अधिकारी व उद्योजक संघटनांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे अनेकदा सर्वांना एकाच वेळी एकत्र आणण्यास वेळ लागतो. त्यामुळे साहजिकच बैठका नियमितपणे होत नाहीत. सध्या नाशिकला होत असलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी गेल्या वर्षभरापासून शासकीय अधिकारी व्यस्त आहेत. ही कामे आटोपल्यानंतर सर्व समित्यांचे काम नियमित होणे अपेक्षित आहे. समित्यांचे काम जरी नियमित नसले तरी विविध शासकीय कार्यालयाशी निमाच्या विविध समित्या संपर्कात असून त्यांचे पदाधिकारी व मेंबर पाठपुरावा करून स्थानिक उद्योजकांचे प्रश्न सोडवत आहे.

धन्यवाद! आपल्या पुढच्या सर्व योजनांसाठी शुभेच्छा!

संजीव नारंग हे गेल्या २० वर्षांपासून निमा, नाईस, निवेक, महाराष्ट्र चेंबर्स या संस्थांच्या माध्यमातून उद्योगांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. निमामध्ये उपाध्यक्ष, खजिनदार, उपसमिती अध्यक्ष या पदांवर काम केल्यानंतर अध्यक्षपदी काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. तसेच नाईसच्या उपाध्यक्षपदीही ते काम करत आहेत. याव्यतिरिक्त विविध सामाजिक संस्थांवरही ते कार्यरत आहेत.


- अविनाश पाठक
नाशिक
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.